मनसेची HotStar कार्यालयात धडक, अमेय खोपकर म्हणाले, महाराष्ट्रात मराठी माणूसच माज करणार, इतरांची दादागिरी नको!
MNS Hotstar Protest : मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी हॉटस्टारच्या कार्यालयात जाऊन क्रिकेटच्या सामन्यांचे मराठीतून समालोचन झाले पाहिजे, असे ठणकावून सांगितले.
MNS Hotstar Protest : एकीकडे मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना आता मनसे पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. आता या पक्षाने क्रिकेट सामन्यांचे मराठीत समालोचन झाले पाहिजे, अशी भूमिका घेत डिज्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केलं. मनसेचे नेते अमय खोपकर (Amey Khopkar) तसेच पक्षाचे इतर कार्यकर्ते मुंबईतील हॉटस्टारच्या कार्यालयात गेले होते. हॉटस्टारने त्यानंतर यापुढे क्रिकेटच्या सामन्यांचे मराठीत समालोचन दाखवले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर महाराष्ट्रात फक्त मराठी माणूसच माज करणार, असे खोपकर यांनी ठणकावून सांगितले.
हॉटस्टारने लेखी आश्वासन दिले आहे
हॉटस्टारने क्रिकेटच्या सामन्यांचे मराठीतून समालोचन करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर अमेय खोपकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी "मी भेटायला नव्हे तर धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रात मराठी भाषा लागावी यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागत असेल तर यासारखी शोकांतिका कोणतीही नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आम्हाला भांडावं लागतं. हॉटस्टारवर जे सामने दाखवले जातात, त्यांचे मराठी भाषेतही समालोचन दाखवू, हे आम्ही जोपर्यंत लेखी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितले होते. त्यानंतर हॉटस्टारतर्फे राज ठाकरे यांच्या नावाने आम्हाला पत्र मिळालेलं आहे, अशी माहिती दिली.
Video :
महाराष्ट्रात फक्त मराठी माणूसच माज करणार
तसेच, "त्यानंतर आता समालोचनाचा सेटअप तयार करायला मी हॉटस्टारला काही वेळ देत आहे. लवकरच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचे मराठीत समालोचन होणार हे त्यांनी आम्हाला लेखी दिले आहे. महाराष्ट्रात माज हा फक्त मराठी लोकांनीच करायचा. इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही,"असेदेखील अमेय खोपकर यांनी ठणकावून सांगितले.
महाराष्ट्रातील लोकांनीही मराठी समालोचन ऐकावं
"आमचं ठिय्या आंदोलन होतं. आम्ही मराठी भाषेसाठी भांडत आहोत. मात्र मी महाराष्ट्रातील मराठी लोकांना आवाहन करतो की त्यांनी समालोचन ऐकण्यासाठी मराठी भाषेसाठीच वापर करावा. मराठीतून समालोचन दाखवण्यासाठी साधारण एखादा आठवडा लागेल," अशीही माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा :
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?