(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालकांकडे फीची सक्ती केल्यामुळे औरंगाबादेत मनसेकडून शाळेत तोडफोड; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण
शाळा प्रशासन पालकांकडून ऑनलाइन शिक्षणाची फी सक्तीने वसूल करत होती, असा आरोप करत मनसे विद्यार्थी आघाडीनं औरंगाबामधील दि जैन इंटनॅशनल स्कुलमध्ये तोडफोड केली.
औरंगाबाद : शहरातील शहरानूर मियाँ दर्गा परिसरात असलेल्या दि जैन इंटनॅशनल स्कुलमध्ये गुरुवारी दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. शाळा प्रशासन पालकांकडून ऑनलाइन शिक्षणाची फी सक्तीने वसूल करत होती, असा आरोप मनसे विद्यार्थी आघाडीनं केला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक फी भरत नाही त्यांना ऑनलाइन अभ्यासासाठीच्या तासिकेची दिलेली लिंक बंद करण्यात आल्याचं मनसेचे म्हणणे आहे. त्यामुळे ही तोडफोड करण्यात आली, असं त्यांचं म्हणणं आहे. तर शाळा प्रशासनाने सांगितले की, प्रवेश घ्यायचा आहे, असे कारण सांगून दोन जणांनी कार्यालयात प्रवेश केला. त्यांच्यापैकी कोणाचेही पाल्य आमच्या शाळेत नाही. अचानक येवून ही तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे शाळेतील शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जैन इंटनॅशनल स्कुलमध्ये गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजता प्रवेश घ्यायचा आहे. असे सांगून दोन जणांनी मुख्याध्यापक संतोष कुमार यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती केली जाते आणि शुल्क आकारणी संदर्भात चर्चा सुरु केली. नंतर अचानक मिसकॉल येताच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अशा घोषणा देत बसलेलीच खुर्ची उचलून तोडफोड करण्यास सुरुवात केली. टेबलची काच आणि खिडकीची काच फोडून घोषणा देत निघून गेले. या सर्व प्रकारामुळे सुरक्षेबाबत भिती व्यक्त करत आज (शुक्रवार) रोजी शाळेचा ऑनलाइन क्लास बंद राहिल, अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली. शुल्क वसुलीसाठी सक्ती केली जात नाही, पालकांना विनंती करण्यात आलेली आहे. शाळा कशी चालवायची असे प्रकार व्हायला लागले तर शाळा बंद करावी लागेल. शाळा प्रशासन आणि पालकांच्या मधील ही बाब असून, यात त्यांचा काय संबंध, असे मुख्याध्यापक संतोष कुमार यांनी म्हटले आहे.
पाहा व्हिडीओ : औरंगाबादमध्ये जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मनसेकडून तोडफोड, सक्तीने फी वसूल केल्याचा आरोप
मनसेने केलेल्या हल्ल्याचा निषेध :
शाळेत जावून मुख्याध्यापकांच्या कॅबिनची तोडफोड केल्याच्या भ्याड हल्याचा मेस्टा संघटना निषेध करते. हल्लोखोरांना जोपर्यंत अटक करुन कडक कारवाइ होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा ऑनलाइन शिक्षण बंद ठेवून आंदोलन करेल. असे मेस्टा संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच झालेल्या घटनेचा शहरातील इंग्रजी संस्थाचालकांनी निषेध केला असून, यासंदर्भात आज ऑनलाइल तासिका बंद ठेवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र इंग्लिश स्कुल असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी सांगितले.
शाळा शुल्क वसूलीसाठी सक्ती करत आहे. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन तासिकेची लिंक बंद केल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. यासंदर्भात वारंवार समजून सांगूनही शाळा प्रशासनाने शुल्क वसुली सुरु ठेवली. यासंदर्भात शिक्षण विभागातही निवेदन दिले होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यांनी शाळेला नोटीस बजावली. शाळा प्रशासनाला धडा शिकवण्यासाठीच हे केल. इतर कुणी शाळा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार असले तर याचप्रकारे आम्ही आंदोलन करु, असे मनसेचे राजीव जावळीकर यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :