Rohit Pawar : गोविंदगिरी महाराजांनी वक्तव्ये त्वरित मागे घ्यावीत, शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य योग्य नाही; रोहित पवारांची नाराजी
प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Rohit Pawar on Govindgiri Maharaj : अयोध्येत राम मंदिरात विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना गोविंदगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. गोविंदगिरी महाराज यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना चुकीचा दाखला दिला असल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी विधान त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.
शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही
रोहित पवार यांनी ट्विट करून गोविंदगिरी महाराज यांनी विधान त्वरित मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सन्माननीय गोविंदगिरी महाराज, आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही.
सन्माननीय गोविंदगिरी महाराज,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 22, 2024
आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू #श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून #छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही.#छत्रपती_शिवाजी_महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही… pic.twitter.com/hvnRDj76f6
आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत
छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, ही विनंती!
काय म्हणाले होते गोविंदगिरी महाराज?
दरम्यान, राम मंदिर अभिषेक सोहळ्यात बोलताना गोविंदगिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. गोविंदगिरी महाराज म्हणाले की, तप करणे ही भारताची परंपरा राहिली आहे. आज मला एका राजाची आठण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लोकांना कदाचित माहीत नाही, ते स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी त्यावेळी सांगितले की, मला राज्य नाही करायचे. मला संन्यास घेऊन भगवान शिवाची सेवा करायची आहे. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे, असे सांगितले.
आज मला समर्थ रामदासांची आठवण झाली, त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटले होते की, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. आज आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















