महायुतीच्या समन्वय बैठकीचे रवी राणांना निमंत्रण नाही; लाडकी बहीण योजनेवरील वादग्रस्त वक्तव्य भोवलं?
Amravati News : अमरावतीमध्ये महायुतीच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या बैठकीला आमदार रवी राणा यांना निमंत्रण दिले नसल्याची माहिती पुढे आली आहे.
Maharashtra Politics अमरावती : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या जोरदार राजकीय संघर्षानंतर संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विदर्भात चांगले यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआ (MVA) याच कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, की महायुती (Mahayuti) या धक्क्यातून सावरत पुन्हा कमबॅक करणार, याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच, आज अमरावतीमध्ये महायुतीच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पश्चिम विदर्भातील महायुतीचे प्रमुख पदाधिकारी बैठकीत सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे या बैठकीसाठी स्थानिक नेते म्हणून आमदार बच्चू कडू यांना निमंत्रण देण्यात आले असताना आमदार रवी राणा यांना मात्र निमंत्रण दिले नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अनेक चर्चाना सध्या उधाण आले असून आमदार रवी राणा यांनी नुकतेच केलेलं लाडकी बहीण योजनेवरील वादग्रस्त वक्तव्य त्यांना आता भोवलंय का? असा प्रश्नही या निमित्याने उपस्थित केला जात आहे.
लाडकी बहीण योजनेवरील वादग्रस्त वक्तव्य भोवलं?
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत महायुतीच्या समन्वय बैठक आज पार पडत आहे. अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात तीनही पक्षाची पदाधिकाऱ्यांची या समन्वय बैठकीला हजेरी असणार आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यातली महायुतीचे खासदार,आमदार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत, भाजपकडून आमदार प्रसाद लाड, सचिन जोशी, आशिष कुलकर्णी, संजय खोडके इत्यादि प्रमुख नेते या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.
महत्वाचे म्हणजे या बैठकीसाठी स्थानिक नेते म्हणून प्रहारचे आमदार आणि गेल्या काही दिवसापासून सरकारवर निशाणा साधणारे बच्चू कडू यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांना मात्र निमंत्रण दिले नसल्याने अनेक चर्चाना सध्या उधाण आले आहे. त्यामुळे महायुतीतील उच्चपदस्थ नेते आमदार रवी राणांवर नाराज तर नाही ना? असा प्रश्नही या निमित्याने आता उपस्थित केला जात आहे.
काय म्हणाले होते रवी राणा?
अमरावतीमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळ्यावेळी बोलताना रवी राणा म्हणाले होते की, आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार.
या कार्यक्रमामध्ये अमरावती जिल्ह्यातील हजारो महिला उपस्थित होत्या. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं मतही रवी राणा यावेळी बोलतांना मांडलं.
हे ही वाचा