(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमदार देवेंद्र भुयार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता
येत्या 10 एप्रिल रोजी अमरावतीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार देवेंद्र भुयार यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झालेले आमदार देवेंद्र भुयार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. येत्या 10 एप्रिल रोजी अमरावतीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार देवेंद्र भुयार यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला डावलून आमदार देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक साधत असल्याने पक्षात त्यांच्याबद्दल नाराजीचे वातावरण तयार झालं होतं. तसंच सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना पक्षातून काढण्याची मागणी लावून धरली होती. यानंतर राजू शेट्टी यांनी भुयार यांची हकालपट्टी केली.
आमदार देवेंद्र भुयार हे सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी आमदार आहेत. मात्र आता स्वाभिमानीतून बाहेर निघाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबत सध्या मी अधिकृत नाही सांगू शकत. यावर वरिष्ठ नेते त्यादिवशी निर्णय घेतील, अशी महिती राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव तथा अमरावती विभागीय सचिव संजय खोडके यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 23 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र या 23 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात विशेषतः पश्चिम विदर्भात पाहिजे तशी वाढली नाही. पश्चिम विदर्भात एकूण 30 जागा आहेत, पण पाहिजे तसे यश मिळत नाही. त्यामुळे पक्षवाढीसाठी शरद पवारांच्या उपस्थितीत विचार मंथन करण्यात येणार आहे. अमरावती विभागात बरेच इच्छुक असून भविष्यात अनेक जणांचे प्रवेश राष्ट्रवादीमध्ये शक्य आहे, मात्र याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असंही संजय खोडके म्हणाले.
देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी 25 मार्च रोजी केली होती. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील हिवरखेड गावात पार पडलेल्या स्वाभिमानीच्या शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली. आमदार देवेंद्र भुयार यांच्यासारख्या चुकीच्या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहिलो याबद्दल मी तुमची जाहीर माफी मागतो अशा शब्दात राजू शेट्टी यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या होत्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून बाहेर
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून बाहेर पडली आहे. 5 एप्रिल रोजी कोल्हापुरात झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राजू शेट्टी यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी केली. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होताना संघटना या आघाडीत सहभागी झाली. सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षात अनेकदा मागणी करुनही संघटनेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन न घेतल्याने शेट्टी नाराज होते. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनाही पत्राद्वारे आपली नाराजी कळवली. पण सरकारने याबाबत कोणतीच दखल न घेतल्यामुळे अखेर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या
- Raju Shetti : राजू शेट्टींचा 'एकला चलो'चा नारा; स्वाभिमानी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची
- Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून अखेर आ. देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी; राजू शेट्टींची घोषणा
- MLA Devendra Bhuyar : हा फक्त इंटर्व्हल, पिक्चर अभी बाकी है, आमदार देवेंद्र भुयारांचा राजू शेट्टींना इशारा
- 'मला विश्वासात घेतलं तर ठीक अन्यथा...'; 'स्वाभिमानी'चे एकमेव आमदार भुयार यांचा इशारा