Ajit Pawar : ...म्हणून संवेदनशील अजित दादांनी पिंपरी चिंचवडचा दौरा रद्द केला
Ajit Pawar : अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील आजचा दौरा रद्द करत, संवेदनशीलता पुन्हा एकदा दाखवली.
Ajit Pawar : विविध शैलीमुळं उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच जनतेला आपलेसे करतात. याचा आजही प्रत्यय आला. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील आजचा दौरा रद्द करत, संवेदनशीलता पुन्हा एकदा दाखवली. एकेकाळचे त्यांचे खंदे समर्थक, मात्र सध्या भाजपचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप हे रुग्णालयात दाखल आहेत. म्हणून अजित पवार यांनी शहरातील विकास कामांची उदघाटनाचा कार्यक्रम रद्द केला. त्यानंतर दौऱ्याच्या वेळेत ते थेट रुग्णालयात पोहचले. जगतापांच्या तब्येतीची विचारपूस केली. राज्यात सध्या एकमेकांवर राजकीय चिखलफेक सुरुये, अशात अजित पवार यांनी टाकलेल्या या पावलाचं कौतुक होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात बऱ्याच प्रतीक्षेनंतर अजित पवारांचा शनिवारी दौरा ठरला. शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं तसं प्रसिद्धी पत्रकाराद्वारे गुरुवारीच कळवलं होतं. त्यानुसार शनिवारी सकाळी सात ते साडे नऊ असा अडीच तासांचा वेळ त्यांनी पिंपरी चिंचवडला दिला होता. सगळी तयारीही झाली होती. पण शुक्रवारच्या सायंकाळी अचानकपणे हा दौरा रद्द झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कळवलं. पण पुण्यातील पुढचा दौरा ठरल्याप्रमाणे होणार होता. त्यामुळं पिंपरी चिंचवडचा दौरा रद्द का केला? असा प्रश्न विचारला जात होता. याचं उत्तर स्वतः अजित पवारांनी त्यांच्या कृतीतून दिलं.
पिंपरी चिंचवड शहरासाठी जी वेळ ठरली होती त्या वेळेत अजित पवार बाणेरच्या रुग्णालयात पोहचले. तिथं एकेकाळचे त्यांचे खंदे समर्थक मात्र भाजपमध्ये प्रवेश करत, चिंचवडचे आमदार झालेले लक्ष्मण जगतापांवर तिथं उपचार सुरु आहेत. जगताप तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहेत, छातीत इन्फेक्शन झाल्याने अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली. आता तब्येतीत सुधारणा आहे. पण असं असताना शहरात लोकार्पण सोहळे करणं आणि भाजपवर एका अर्थाने स्थानिक आमदारांवर बोलणं उचित ठरणार नाही. म्हणून ऐनवेळी दादांनी हा दौरा रद्द केला. आणि जगतापांच्या तब्येतीची विचारपूर करण्यासाठी ते रुग्णालयात पोहचले. एकेकाळी जगताप हे दादांचे कट्टर समर्थक होते, पण 2014 च्या विधानसभेपूर्वी जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत, सत्ता काबीज करण्यात आणि 2019 च्या मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांचा पराभव करण्यात जगतापांनी मोलाचा वाटा उचलला. हे सगळं विसरून अजित पवारांनी संवेदनशीलता दाखवली.
अजित पवार.... शब्द पाळणारा माणूस.... वेळेचं भान राखणारा व्यक्ती.... कामात कुचराई करणाऱ्यांची खरडपट्टी करणारे दादा.... पक्षाच्या धोरणांना हरताळ फासणाऱ्या स्वपक्षीयांना ही खडेबोल सुनावणारा नेता, अशा अनेक गोष्टींमुळं चर्चेत असणारं हे नाव. अगदी विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा भावणारा हा नेता. त्यात आता या संवेदनशीलतेची ही भर पडलीये. राज्यात सध्या एकमेकांवर राजकीय चिखलफेक सुरुये, अशात अजित दादांनी टाकलेल्या या पावलाचं कौतुक होत आहे.