Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांच्या अमित शाहांना शुभेच्छा आणि राजकीय चर्चांना उधाण
Milind Narvekar : उद्धव ठाकरे आणि अमित शाहा यांच्यातलं टोकाला गेलेलं भांडण काही वेगळं सांगायला नको त्यात या शुभेच्छा चर्चेचा विषय बनला आहे.
Milind Narvekar : उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. आज तर त्यांनी अमित शाहांना ट्वीटरवरून शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कारण उद्धव ठाकरे आणि अमित शाहा यांच्यातलं टोकाला गेलेलं भांडण काही वेगळं सांगायला नको त्यात या शुभेच्छा चर्चेचा विषय बनला आहे.
महाराष्ट्रातले ठाकरे आणि दिल्लीतले शाहा हे दोघेही जुने मित्र पण सध्या पक्के वैरी झाले आहेत. दोघेही जवळपास एकमेकांना बघुन घेत नाहीत. दोघेही अरे ला का रे करतात आणि राज्यातलं राजकारण बदलवून टाकतात. हे सांगण्यामागचं कारण एवढंच की दोघांमध्ये एवढं वितुष्ट निर्माण झालेलं असताना, उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जाणा-या मिलिंद नार्वेकरांनी चक्क अमित शाहांना शुभेच्छा दिल्या आणि राजकीय चर्चांना उधाण आलं.
शिंदे गट बाजुला झाल्यापासून नार्वेकरही शिंदे गटात जाणार चर्चा जोरदार झाल्या होत्या. त्याच नार्वेकरांनी अमित शाहांना दिलेल्या शुभेच्छा हे बरंच काही सांगून जातं. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे, देवेद्र फडणवीस आशिष शेलार आणि इतर नेत्यांसोबतची जवळीक ब-याच वेळा दिसून आली. मिलिंद नार्वेकरांच्या घरी आईच्या निधानानंतर सात्वनाला तर कधी गणपतीच्या दर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जुन उपस्थित राहिले. तर दुसरीकडे नार्वेकरांच्या घरी गणपतीला आणि नार्वेकरांसाठी एमसीएच्या मतदानाला उद्धव ठाकरेंनी दांडी मारली होती.
Wishing Hon. Home Minister Shri. Amit Shah ji a very happy birthday!
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 22, 2022
May the almighty bless you with a long and healthy life. pic.twitter.com/8u3dYuASMZ
अमित शाहा यांनी मातोश्रीवर दिलेल्या वचनावरून महाराष्ट्रात मोठं घमासान पाहायला मिळालं होतं अमित शाहांनी दिलेला शब्द मोडला आणि शिवसेना भाजपची युतीही संपुष्टात आली. त्यानंतर महाविकास आघाडीची निर्मिती झाली. सरकारला काही काळ होताच एकनाथ शिंदेंचं बंड झालं. पण या सगळ्या घडामोडीत नार्वेकर नेहमीच चर्चेत राहिले. शिंदे सुरतला असताना बोलणी करायलाही नार्वेकर यांनांच पाठवलं होतं.
उद्धव ठाकरेंचे विश्वासू म्हणून नार्वेकर यांच्याकडे पाहिले जातं पण आता नार्वेकरांची भूमिका काय ? हे अद्याप स्पष्ट होत नाही.
मिलिंद नार्वेकर सध्या मातोश्रीवरही तर जातात आणि इकडे अमित शाहांना शुभेच्छाही देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नार्वेकरांच्या घरीही जातात आणि उद्धव ठाकरे मात्र जात नाहीत, सध्याची समीकरणं ही अशी आहेत त्यामुळे मिलिंद नार्वेकर सध्या दोन्ही ठिकाणी चांगले संबंध ठेऊन आहेत. हे स्पष्ट दिसतंय पण आगामी काळात काही वेगळी भुमिका घेतायत का? हे पाहावं लागेल.