(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MHADA Pune Lottery 2020: म्हाडाची 5,647 घरांसाठी सोडत, आजपासून नोंदणी सुरु, पुण्यासह सोलापूर, सांगलीतही घरं उपलब्ध
पुणे विभागात 5 हजार 647 घरांसाठी म्हाडाच्या वतीने काल सोडत काढण्यात आली आहे.आज, 11 डिसेंबर ते 11 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज नोंदणी करता येईल. तर 12 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.
मुंबई : 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या योजनेअंतर्गत पुणे विभागात 5 हजार 647 घरांसाठी म्हाडाच्या वतीने काल सोडत काढण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी या सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते. आज 11 डिसेंबर ते 11 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज नोंदणी करता येईल. तर 12 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.
प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्यात म्हाळूंगे (चाकण) येथे 514, तळेगांव दाभाडे येथे 296, सोलापूर जिल्हयात गट नं. 238/1, 239 करमाळा येथे 77 तर सांगली येथे स.क्र.215/3 येथे 74 सदनिका अशा एकूण 961 सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. तर म्हाडा अंतर्गत पुणे येथील मोरवाडी पिंपरी येथे 87, पिंपरी वाघेरे येथे 992 अशा एकूण 1079 सदनिका आहेत. तसेच सांगली येथे 129 सदनिका आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजतेंतर्गत पुणे जिल्हयात महाळुंगे येथे 1880, दिवे येथे 14 तर सासवड येथे 4 सदनिका आहेत. तसेच सोलापूर जिल्हयात 82 सदनिका आहेत, अशा एकूण 1980 सदनिका आहेत. 20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका येथे 410, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 1020 तर कोल्हापूर महानगरपालिका येथे 68 अशा एकूण 1498 सदनिका आहेत.
ही सर्व घरं अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत. इच्छूकांनी 10 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते 11 जानेवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.