(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Medical Exam Postponed : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्भूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळतोय. अशातच निवासी डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या पार्श्भूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या 14 फेब्रुवारी 2022 पासून घेण्यात येणार आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा 17 जानेवारी 20220 पासून सुरु होणार होत्या. तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा या 28 फेब्रुवारी 2022 पासून घेण्यात येणार आहेत. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 31 जानेवारी 2022 पासून सुरु होणार होत्या. राज्यात ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यात काल तब्बल 40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14, 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या 87 हजार 505 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 47 हजार 410 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 टक्के आहे.