रुग्णांना रक्त पुरवठ्यासाठी होणार ड्रोनचा वापर
योग्य वेळी रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राणही गमावावे लागतात. त्यामुळे ड्रोनद्वारे रक्तपुरवठा करणारी टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात सुरू होणार आहे.
नागपूर : ड्रोनद्वारे रक्तपुरवठा करणारी टेक्नॉलॉजी लवकरच महाराष्ट्रात सुरू होणार आहे. तसं झाल्यास ही आरोग्यसेवेतील एक क्रांतीच असेल. योग्य वेळी रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमावावे लागतात. हीच बाब लक्षात घेत तीन तरुणांना अशाप्रकारे मेडिकल ड्रोनद्वारे रक्तपुरवठा करण्याची कल्पना सुचली.
अंशुल शर्मा, अरुणाभ भट्टाचार्य, रिषभ गुप्ता या तीन इंजिनीअर तरुणांनी या टेक्नॉलॉजीची सुरुवात केली आहे. रक्त पोहचवणाऱ्या या ड्रोनचं नेपाळच्या अन्नपूर्णा डोंगराळ प्रदेशातून पोखराच्या ग्रामीण भागात आणि ग्रामीण कर्नाटकाच्या चित्रदुर्गा येथे यशस्वी टेस्टिंग करण्यात आलं आहे. ब्लडस्ट्रीम नावाच्या कंपनीने लाईफलाईन ब्लड बँकेसह ही सेवा उपलब्ध करून द्यायचा करार केला आहे.
कठीण भूभाग, वाईट रस्ते, वाईट हवामान ह्याचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील गावांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांवर होत असतो. ड्रोनने रक्त पोहचवताना पैसा तर वाचेलच तसेच ऑपरेशन्समधील अडचणींवरही मात करता येईल. त्यामुळे नागपूर येथे या तरुणांनी थेट ड्रोनद्वारे ग्रामीण भागातील गरजूंना रक्त पुरवण्यासाठी लॉजिस्टिक कंपनी सुरु केली.
ड्रोनची वैशिष्ट्ये रक्तपुरवठा करणाऱ्या या ड्रोनचं वजन 9 किलो आहे. त्यातून दीड किलो औषधं पोहचवली जाऊ शकतात. तितक्याच वजनाच्या रक्ताच्या पिशव्या नेता येणंही शक्य आहे. एकदा इलेक्ट्रिकवर चार्ज केलं की, ड्रोन 105 किलोमीटर प्रवास करतो. विशेष म्हणजे पाऊस आणि वाऱ्याचा ड्रोनवर काहीही परिणाम होत नाही. ड्रोन 100 मीटर उंचीवर उडते. रक्ताच्या पिशव्या खाली टाकण्यासाठी हे ड्रोन 30 मीटर खाली येते. पिशवीला खाली पडताना पॅरॉशूट घेऊन जाते.
अमेरिकेसह प्रगत राष्ट्रांमध्ये मेडिकल ड्रोनला परवानगी मिळाली आहे. भारतात हा प्रयोग यशस्वी झाल्यास डोंगरदऱ्यात राहणाऱ्या गरजूंना आरोग्य सुविधा तातडीने मिळू शकतील. त्यामुळे ही ड्रोन सेवा आरोग्य क्षेत्रातली देवदूत ठरेल.