(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिककरांसाठी मोठी बातमी! या वर्षीपासून नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार, मंत्री छगन भुजबळांची माहिती
नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असून PG कोर्स सुरू करणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.नाशिक जिल्ह्याला 151 वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितलं.
नाशिक : नाशिककरांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. या वर्षीपासून नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असून PG कोर्स सुरू करणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. सोमवारी केंद्र सरकारकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवणार असून यासाठी मनपा, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सहकार्य घेणार आहोत. नाशिक जिल्ह्याला 151 वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितलं.
भुजबळ म्हणाले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बाजूच्या 14 हेक्टर पडीक जागेवर महाविद्यालय साकारणार आहोत. आरोग्य विज्ञान विद्यापीठ सुसज्ज करणार असून आता सर्व वैद्यकीय शाखांचे महाविद्यालय सुरू करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात अंतर निर्माण झाले राज्यपालांच्या संदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की, राज्यपाल सरकारचे प्रमुख असतात. प्रत्येकाचे हक्क कर्तव्य वाटून दिलेले असतात. मुख्य निर्णय राज्यपाल यांनी लवकरात लवकर घेणे, मंत्रिमंडळाच्या मागे उभे राहणे राज्यपाल यांचे काम आहे. मंत्रिमंडळानेही राज्यपाल यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात अंतर निर्माण झाले आहे, असं भुजबळ म्हणाले. ते म्हणाले की, आज चार महिने झाले आमदारांच्या नावांवर सही होत नाही. याआधी असा तणाव कधी निर्माण झाला नव्हता. शिवसेना भाजपने 12 नावं पाठवली होती ती त्या काळी लगेच मंजूर झाले. हे आता का नाही होत याचा विचार करावा लागेल, असं ते म्हणाले.
भुजबळ म्हणाले की राज्यात शिवजयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. मात्र कोरोनाचे नियम सर्वांनी पाळण्याची गरज आहे. यावेळी नाना पटोले यांना ईडीची नोटीस आल्याचं वृत्त असल्याचा प्रश्न विचारताच भुजबळ यांनी डोक्याला हात लावला. आता ईडीची बिडी सगळ्यांना जाळत सुटली आहे, असं ते म्हणाले. जेजुरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा अनावरणासंदर्भातील गोंधळावर बोलताना ते म्हणाले की, शरद पवार यांच्या हस्ते पुतळा अनावरण होणार होते. मात्र त्या आधी उद्घाटन केल्यानं प्रसिद्धी मिळते. मात्र राज्याला हे शोभनिय नाही, असं ते म्हणाले.