मराठी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या गुगलीमुळे भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेची अडचण?
मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या एका गुगलीमुळे भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेची चांगलीच अडचण झाली आहे. साहित्य संमेलनावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये राजकारण रंगू लागलं आहे.

नाशिक : शहरात होऊ घातलेल्या मराठी साहित्य संमेलनातील राजकीय हस्तक्षेपामुळे आधीच संमेलन चर्चेचा विषय ठरत असतानाच आता निधीच्या मुद्द्यावरून स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या एका गुगलीमुळे भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेची चांगलीच अडचण झाली आहे. साहित्य संमेलनावरून महाविकास आघाडी आणि भाजपमधील राजकारण पुन्हा रंगू लागलं आहे.
यंदाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडतंय. नाशिकला लाभलेला साहित्यिकांचा इतिहास बघता हे संमेलन नाशिकमध्ये व्हावं अशी मागणी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून साहित्य महामंडळाला करण्यात आली होती आणि या मागणीला यश मिळाले असून 26 ते 28 मार्च दरम्यान शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात हे संमेलन रंगणार आहे. हे संमेलन आगळं वेगळं कसं होईल यासाठी नियोजन समिती प्रयत्नशील आहे, महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून या संमेलनाला साहित्यिक-कवी हजेरी लावतील असा अंदाज वर्तवला जातोय आणि त्यामुळेच आता तयारीही जोरदार सुरु झालीय. मुळात संमेलन पार पाडणं ही काही सोपी गोष्ट नसल्याने यासाठी आता निधी गोळा केला जातोय. नुकतेच राज्य सरकारने संमेलनासाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली तर संमेलनाच्या नियोजनासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नाशिकच्या आमदारांनी प्रत्येकी 10 लाख तर महापालिकेने 50 लाख रुपये द्यावेत अशी अपेक्षा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. दरम्यान, "उद्धव ठाकरेंकडे मी मागणी केली होती, महाराष्ट्र सरकारने 50 लाख रुपये दिले आहे. तसेच सरकारप्रमाणे महापालिकेचे महापौर, आयुक्त, गटनेत्यांनी निधी द्यावा" अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केलीय.
साहित्य संमेलनातील वादाची पंरपरा कायम, संमेलनातील राजकीय हस्तक्षेपामुळे वादाला सुरुवात
भुजबळांनी ही मागणी तर केली. मात्र, यामुळे महापालिकेची चांगलीच अडचण झाली असून निधीमुळे भुजबळ आणि महापौरांमध्ये दुमत असल्याचं समोर आलंय. आधीच कोरोनामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली असून उत्पन्नात साडेचारशे कोटी रुपयांची घट झाली आहे. यासोबतच महापालिकेला तीन लाखांची अनुदान मर्यादा असताना 50 लाख रुपये द्यायचे कुठून? असा प्रश्न महापौर सतीश कुलकर्णी यांनी उपस्थित केलाय.
50 लाख एवढा निधी देणे शक्य नाही, कोरोनामुळे चारशे-साडेचारशे कोटींचा आधीच महापालिकेला तोटा झालाय, संमेलन नाशिकला होतंय ही नक्कीच आनंदाची बाब आहे, किती निधी द्यायचा आणि ईतर प्रकारे मदत कशी करता येईल याबाबत गटनेते आणि ईतरांसोबत चर्चा करू, अशी प्रतिक्रिया महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिलीय.
राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार असून नाशकात होणाऱ्या संमलेनाचे स्वागताध्यक्षही महाविकास आघाडीचे नेते भुजबळ आहेत तर दुसरीकडे नाशिक महापालिकेवर मात्र भाजपची सत्त्ता असल्याने भुजबळ यांनी केलेली ही मागणी म्हणजे महापालिकेला पर्यायाने भाजपला अडचणीत पकडण्यासाठी टाकलेली गुगली तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
नाशिकमध्ये होऊ घातलेल्या या संमेलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांना मानाचे स्थान दिले गेल्याने हे संमेलन महाविकास आघाडी हायजॅक करू पाहते आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता या निधी प्रकरणामुळे नविन वाद निर्माण झालाय. महाविकास आघाडी आणि भाजपला राजकारणासाठी आता साहित्य संमेलन हे नवीन कारण मिळालय हे मात्र नक्की.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
