![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
यवतमाळमध्ये 89 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध
विविध मागण्यांचं निवेदन घेऊन आज सर्व डॉक्टर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. मात्र त्यांना जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.
![यवतमाळमध्ये 89 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध Mass resignation of 89 medical officers in Yavatmal यवतमाळमध्ये 89 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/28233539/WhatsApp-Image-2020-09-28-at-6.01.51-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
यवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या 89 वैद्यकीय अधिकारी यांनी आज राजीनामे दिले आहेत. जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या निषेधार्थ सामूहिक राजीनामे दिले आहेत.
मेग्मो संघटनेचे पदाधिकारी कमी मनुष्यबळ असताना मागील अनेक महिन्यापासून ग्रामीण भागात अविरत वैद्यकीय सेवा देत आहेत. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची एकही दिवस सुट्टी मिळत नाही. सतत काम करत असल्याने त्यांना मानसिक तणाव येत होता. त्यात जिल्ह्यातील 23 वैद्यकीय अधिकारी आणि 67 आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. अशावेळी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 50 राखीव बेड ठेवण्यात यावे तसेच कोरोनाचे रिपोर्टबाबत माहिती सायंकाळी 7 पर्यंत घ्यावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बेग यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबाला शासनाने 50 लाख रुपयांची मदत द्यावी, सतत काम करत असल्याने किमान रविवारीची सुट्टी मिळावी अशा स्वरूपाचे निवेदन घेऊन आज सर्व डॉक्टर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. मात्र त्यांना जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.
या वागणुकीच्या विरोधात डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे देत काम बंद आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच सर्व डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनाच्या सोशल मीडियावरच्या ग्रुपमधून डॉक्टर आता बाहेर पडले आहेत. डॉक्टरांच्या या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आणि प्रशासनाच्या वागणुकीमध्ये सुधारणा व्हावी अशी डॉक्टरांची मागणी आहे.
गेल्या कित्येक महिन्यात आम्हीं कुठलाही सण कुटुबासोबत साजरा केला नाही. आई-वडिलांची, घरच्यांची भेट झाली नाही. मात्र एक जबाबदारी म्हणून काम करत असताना प्रशासनाने आमच्या विषयी उदासीन भूमिका घेत असल्याने सामूहिक राजीनामा दिला आहे, असं वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)