(Source: Poll of Polls)
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, घरांची पडझड, 484 जनावरे दगावली, 22 महसूलमंडळात अतिवृष्टी
सर्वाधिक मृत्यू लातूर जिल्ह्यात झाले असून लहानमोठी 484 जनावरे दगावली आहेत. घरांची पडझड झाली असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याची महसूल विभागाची माहिती आहे.
Marathwada Rain: राज्यभरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा एकदा ॲक्टीव्ह झालाय. मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढला असून पावसाळा सुरु झाल्यापासून पावसामुळे 33 जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. हे मृत्यू वीज पडून तसेच पुराच्या पाण्यात वाहून तसेच इतर आपत्तीमुळे झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार पावसाळा सुरु झाल्यापासून मराठवाड्यात 472 जनावरांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान मराठवाड्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
सोमवारी झालेल्या पावसात एक महिला ठार, 9 जनावरे दगावली.
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी झालेल्या पावसात हिंगोली जिल्ह्यातील सेनगावमधील एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच एका रात्रीत पावसाच्या घटनांमध्ये मराठवाड्यातील 9 जनावरे दगावली आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी सकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी कोसळत होत्या. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव्ह मोडवर आला असून बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोनुसार 2010 ते 2020 या काळात भारतात वीज पडून होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दरवर्षी प्रति राज्य ही संख्या जवळपास दुप्पट झाली आहे.
मराठवाड्यातील 22 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी
अधिकृत आकडेवारीनुसार मराठवाड्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे 22 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यात 20 तारखेच्या पावसाने दाणादाण उडवली असून सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. आजवर मराठवाड्यात 73 टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून 25 ऑगस्टपर्यंत रोज पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. छत्रपती संभाजीनगर मध्ये 76%, जालना 81, बीड 85, लातूर 76, धाराशिव 79, नांदेड 67, परभणी64,हिंगोली 66 टक्के पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक मृत्यू लातूर जिल्ह्यात झाले असून लहानमोठी 484 जनावरे दगावली आहेत. घरांची पडझड झाली असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याची महसूल विभागाची माहिती आहे.
संपूर्ण राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. पुन्हा एकदा राज्यभरात पाऊस सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. आज पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात पावसाची शक्यता (Heavy Rain) आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवेचा दाब अनुकूल होत असल्यामुळे राज्यात 25 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. मान्सून सक्रीय (Monsoon active) होण्याची सुरूवात मुंबई व पुणे शहरातून होणार आहे. येत्या 72 तासांमध्ये या दोन्ही शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मान्सून 25 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरपर्यंत असे सलग तीन आठवडे सक्रिय राहणार आहे. आज (बुधवारी 21 ऑगस्ट) संपूर्ण राज्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.