Marathi Sahitya Sammelan : 'मराठी की कोकणी' ठाले पाटील आणि दामोदर मावजो यांच्यामध्ये संमेलनात वाद प्रतिवाद
Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाच्या वेळी कौतिकराव ठाले पाटील आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांच्यात 'मराठी की कोकणी' यावरून वाद प्रतिवाद सुरु झाले.
Marathi Sahitya Sammelan : उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात जोरदार करण्यात आली आहे. या साहित्य संमेलनाच्या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांचा 'मराठी की कोकणी' यावरील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. यातून प्रश्न प्रतिप्रश्न सुरु झाले आहेत तसेच एकमेकांना आवाहनही देण्यात आले आहेत.
काय म्हणाले कौतिकराव ठाले पाटील ?
कोकण भागातील अनेक साहित्यिकांनी कायम मराठी भाषेतूनच लेखन केले आहे. त्यांनी कोकणी भाषेतून लेखन का केले नाही? असा सवाल कौतिकराव ठाले पाटील यांनी उपस्थित केला आहे. आजवर अनेक कारणांवरून देशात राजकारण चालले आहे, तसेच भाषिक राजकारण चालतात. त्यातून 1975 साली कोकणीला भाषेचा दर्जा देण्यात आला. मात्र, मराठी भाषेची बोलीभाषा ही कोकणी आहे. यावर ठाले पाटील यांनी जोर देत आपला मुद्दा मांडला होता. गोवा सरकारने मराठीचा द्वेष करणे सोडून दिले पाहिजे, अशी अपेक्षा कौतिकराव ठाले पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
तर, आमच्या राजकारण्यांनी मराठी भाषेचा बळी देऊन 'कोकणी' ही गोव्याची राजभाषा केली. मराठी भाषेला टाळून कोकणी भाषेला हे स्थान देण्यात आले हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. मराठी भाषेला दुसरी भाषा म्हणून दर्जा द्यावा, अशी मागणी गोवा सरकारकडे करणार असल्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.
काय म्हणाले दामोदर मावजो ?
यावर दामोदर मावजो यांनी कौतिकराव ठाले पाटील यांना जाहीरपणे यावर परिसंवाद घेऊन चर्चा करू, असे सांगत आवाहन दिले आहे. तुमच्या मताप्रमाणे मराठीची बोलीभाषा कोकणी आहे तर त्यात मी लिहितो मग तुम्हाला आक्षेप का ? खरंतर, भाषा हा माणसांना जोडणारा दुवा आहे. आपण अनेक भाषा आत्मसात केल्या पाहिजे. यावर वाद-प्रतिवाद होता कामा नये. तसेच, मला मराठी भाषा विरोधक म्हणणारा वाद हा पूर्वी झाला होता. तो पुन्हा उखरून काढू नये असा चिमटाही मावजो यांनी ठाले पाटील यांना काढला आहे. तसेच, पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोव्यात भरावा आम्ही साथ देऊ असा आशावादही ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना या ठिकाणी सन्मानाने बोलावले असताना ठाले पाटील यांनी हा वाद पुन्हा का काढला अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरु होती.
महत्वाच्या बातम्या :
- Marathi Sahitya Sammelan : राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उदगीर सज्ज; 95 व्या मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण
- Marathi Sahitya Sammelan : आजपासून उदगीरमध्ये साहित्यिकांचा मेळा; तीन दिवसांच्या साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांची लयलूट
- Marathi Sahitya Sammelan : स्वागतासाठी उदगीर सज्ज; 95 व्या मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण