Marathi Bhasha Din: प्रमाणभाषेच्या नावाखाली आपण बोलीभाषा संपवतोय, ती जपली पाहिजे: नागराज मंजुळे
Marathi Bhasha Din: मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एबीपी माझा आपल्या या मायमराठीचा वैचारिक जागर करणार आहे. आज आणि उद्या दोन दिवस मायमराठीचा हा जागर एबीपी माझावर असणार आहे.
मुंबई: आपण प्रमाणभाषा बोलण्याच्या नादात बोलीभाषा संपवतोय, तसं न होता आपली बोलीभाषा प्रत्येकाने जपली पाहिजे असं मत दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी मांडलं. एबीपी माझाने आयोजित केलेल्या अभिजात मराठीचा जागर या कार्यक्रमात ते बोलत होते.
दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले की, "भाषेवरील आक्रमण हे अत्यंत फ्रेन्डली होतंय, प्रेमाची मिठी मारुन आक्रमण होतंय. ज्ञानेश्वरीमधील अंगरखा हा शब्द आता लयास गेला आहे. आपण आपलीच भाषा प्रमाण भाषेच्या नावाखाली संपवतोय. प्रमाण भाषा अशी मुळात नाहीच. पण आपण प्रमाण भाषेच्या नावाखाली आपली बोलीभाषा संपवतोय. हे होता कामा नये."
नागराज मंजुळे पुढे म्हणाले की, "आपण शहरात गेल्यानंतर प्रमाण भाषा बोलायचा प्रयत्न करतो आणि घरी आल्यावर आपल्या बोलीभाषेत बोलतो. त्यावेळी आपल्या बोलीभाषेबद्दल आपल्याच मनात न्यूनगंड निर्माण होतो आणि मग आपण त्याचा वापर करणे थांबवतो. हे असं न करता प्रत्येकाने आपली बोलीभाषा जपली पाहिजे."
मराठी वेबसिरीज असली तर ते ओटीटीला कोणी घेत नाही असं नागराज मंजुळे म्हणाले. फक्त मराठी म्हणून आपण बघत बसलो तर आपला स्तर घसरला जाईल. जगात काय सुरू आहे हे समजून घेऊन तसा प्रयोग मराठीत केला तर त्याचा काहीतरी फायदा होईल असंही ते म्हणाले.
मी मराठी गाणी ऐकायला लागलो ते अजय-अतुल यांच्या संगितामुळे असं नागराज मंजुळे म्हणाले. मराठी भाषा सशक्त झाली पाहिजे, आपण जे काही जगतोय ते आपण मांडलं पाहिजे असंही ते म्हणाले.
मराठी, अभिजात मराठी, आपल्या मनामनात दंगणारी मराठी, आपल्या रगारगात रंगणारी आणि उराउरात स्पंदणारी मराठी. संत ज्ञानेश्वरांनी जिचा उल्लेख, 'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके' अशा शब्दांत केला आहे. हजारो वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेली ही आपली मायमराठी भाषा अभिजात होती, आहे आणि राहील. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एबीपी माझा आपल्या या मायमराठीचा वैचारिक जागर करणार आहे. साहित्य, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिजात मराठीचं मंथन या कार्यक्रमात होणार आहे. आज आणि उद्या दोन दिवस मायमराठीचा हा जागर एबीपी माझावर असणार आहे.
संबंधित बातम्या :