Marathi Bhasha Din : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी? मराठी भाषा मंत्री थेट म्हणाले...
Subhash Desai : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी? याबाबत मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी अभिजात मराठीचं मंथन या कार्यक्रमात सांगितलं...
Marathi Bhasha Din : मराठी. अभिजात मराठी. आपल्या मनामनात दंगणारी मराठी. आपल्या रगारगात रंगणारी आणि उराउरात स्पंदणारी मराठी. संत ज्ञानेश्वरांनी जिचा उल्लेख, 'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके' अशा शब्दांत केला आहे. हजारो वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेली ही आपली मायमराठी भाषा अभिजात होती, आहे आणि राहील. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एबीपी माझा आपल्या या मायमराठीचा वैचारिक जागर करणार आहे. साहित्य, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिजात मराठीचं मंथन या कार्यक्रमात होणार आहे. आज आणि उद्या दोन दिवस मायमराठीचा हा जागर एबीपी माझावर असणार आहे. पहिल्या चर्चासत्रात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), खासदार सुप्रिया सुळे (supriya Sule), भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) उपस्थित होते. या सत्राचं संचालन एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि ज्ञानदा कदम यांनी केलं.
कार्यक्रमाच्या पहिल्या चर्चा सत्रामध्ये सुभाष देसाई यांनी सांगितलं, 'या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी एबीपी माझाचे आभार मानतो. मी दोन दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन आलो तेव्हा किशन रेड्डी यांना भेटलो. मी त्यांना सुरूवातीला सांगितलं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही विनंती करायला मी आलेलो नाही. मी तुमचे आभार मानतो की तुम्ही संसदेमध्ये हे स्पष्ट केलं की, मराठी भाषेची मागणी ही पूर्ण योग्य आहे. आम्ही लवकरच मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करू. त्या आश्वासनाबद्दल मी त्यांचे आभार मानले. मी त्यांना विनंती केली की 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रम मुंबईमध्ये होणार आहे तिथे तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतची घोषणा करावी. तेव्हा आम्हाला तुमचे आणि केंद्र सरकारचे आभार मानण्याची संधी मिळेल.'
गेल्या दोन वर्षात मराठी शाळांमध्ये जास्त प्रवेश आले आहेत. तसेच मराठीतून शिकलेल्यांना रोजगाराची संधी देखील असते. पुण्यात इंजिनियरिंगचे मराठीतून शिक्षण सुरू झाले आहे, अस ही या वेळी सुभाष देसाई यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या:
Marathi Bhasha Din : ..म्हणून आम्ही इंग्रजी शाळेत शिकलो : सुप्रिया सुळे
Marathi Bhasha Din : मराठी भाषेचा आग्रह धरा, पण अनावश्यक हट्ट नको : विनोद तावडे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha