(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule: आमदारांच्या घरावर हल्ला हे सरकारचं अपयश, गृहमंत्र्यांना झेपत नाही, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; सुप्रिया सुळेंची मागणी
Maratha Reservation : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली असून त्याला गृहमंत्री जबाबदार आहेत असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
मुंबई : राज्यातील आमदारांच्या घरावर हल्ला होतोय, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे, हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. मराठा आंदोलन हे गृहमंत्र्यांना (Devendra Fadanvis) झेपत नाही, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा अशी मागणीही सुळे यांनी केली.
राज्यात मराठा आंदोलक (Maratha Reservation Protest) आक्रमक झाले असून त्यांनी आज आमदार प्रकाश साळुंखे यांच्या घरावर आणि कार्यालयावर हल्ला केला. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या एका आमदाराच्या घरामध्ये जाळपोळ होतेय ही अतिशय गंभीर घटना घटना आहे. यावर राज्यातल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. माजलगावच्या पंचायत समितीमध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडली. हे राज्य सरकारचं अपयश आहे.
मराठा, धनगर आणि लिंगायत आरक्षणामध्ये फसवाफसवी सुरू असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याची चौकशी करावी. राज्याच्या गृहमंत्र्यांना हे झेपत नाही, तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा.
आमदार प्रकाश सोळुंखे यांच्या घरावर हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची दगडफेक करण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या संदर्भात सोळुंकेंनी काल वक्तव्य केलं होतं. मागील एक तासापासून दगडफेक होत आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यामधून धुराचे लोळ येत असल्याचं दिसत आहे.
आमदार प्रकाश सोळुंकेंसोबत संपर्क साधण्याचा एबीपी माझानं प्रयत्न केला. मात्र, गोंधळ एवढा होता की, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यानंतर मात्र प्रकाश सोळुंकेंसोबत संपर्क झाला. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिली. तसेच, मराठा आंदोलकांना आवाहनही केलं.
मी मराठा समाजाचाच आमदार, आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा : आमदार प्रकाश सोळुंके
आमदार प्रकाश सोळुंकें बोलताना म्हणाले की, "मी माजलगावमध्येच आहे. मी घरातच आहे. आज सकाळी अचानक काही आंदोलक माझ्या घरी आहे. माझ्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. घराचं, ऑफिसचं आणि गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. आपल्या माध्यमातून मी सर्व आंदोलकांना विनंती करणार आहे की, मी मराठा समाजाचाच आमदार आहे आणि माझाही मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. आरक्षण मिळावं अशी माझीही मागणी आहे. काही राजकीय विरोधक असतात जे काही बाबतीत चिथावणी करु शकतात. माझा कोणत्याही आंदोलकांवर राग नाही, मी त्यांच्या भावना समजू शकतो की, त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे अशा बाबतीत राजकीय विरोधक संधी घेतात, असाच प्रकार याबाबतीत झाला असल्याचं मला वाटतं."
ही बातमी वाचा: