(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : सोशल मीडियावर मराठा आंदोलनाची चलती, गावोगावी आरक्षणासाठी पोस्ट व्हायरल
Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाचा लढा आता सोशल मीडियावरही सुरू करण्यात आला असून त्यासाठी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
Maratha Reservation Protest : मराठा आरक्षण याच विषयाभोवती मागच्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मनोज जरंगे पाटील (Manoj Jarange)यांनी पुन्हा आंतरवालीत आंदोलन सुरु केले आहे. परिणामी राज्यातल्या प्रत्येक गावात, शहरात आंदोलनं सुरू आहेत, तेही तीव्रतेने. मात्र एकीकडे हे प्रत्यक्ष आंदोलन सुरू असताना सोशल माध्यमांचाही या आंदोलनासाठी मोठा उपयोग केला जात आहे. प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवर मराठा आरक्षणाबाबत पोस्टचा अक्षरशः पाऊस पडतोय. प्रत्येक घटना मीडियामध्ये येण्याआधी सोशल मीडियावर येत आहे.
आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यातील मूलभूत गरजच सोशल माध्यमं झाली आहेत. वैयक्तिक असो की सामाजिक गोष्ट, प्रत्येक अपडेट फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, स्नॅपचॅट आदी प्लॅटफॉर्मवर केली जात आहे. याच माध्यमांचा मराठा आरक्षणाबाबत जोरदार उपयोग केला जात आहे.
प्रत्येक गावातील तरुणांना व्हॉट्सअॅप ग्रुप
व्हॉट्सअपवर सकल मराठा समाजाच्या नावाने प्रत्येक गावनिहाय ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. दिवसभराच्या ज्या काही अॅक्टिव्हिटी आहेत त्या या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवल्या जात आहेत. त्यानंतर जे आंदोलन किंवा जी अॅक्टिव्हिटी करण्यात आले आहेत त्या संदर्भात फेसबुकवर पोस्ट केल्या जात आहेत. इंस्टाग्राम रिल्स बनवल्या जात आहेत, मीम्स बनवल्या जात आहेत. तसेच ट्विटरवरही मराठा आरक्षण असेल मराठा नावाने ट्रेंड केला जातोय. एकूणच काय तर सर्वच सोशल प्लॅटफॉर्मवर सध्या मराठा आरक्षणाची चलती आहे.
या आंदोलनाचे वैशिष्ठ म्हणजे गाव पातळीवर जे तरुण विविध पक्षातील नेत्यांसाठी काम करत होते ते फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी आणि मनोज जरंगे पाटलांच्या समर्थनार्थ व्हिडीओ करत आहेत. जरांगे पाटलांचे भाषण, चित्रपटांमधील गाजलेले डायलॉग, फेमस गाण्यांचे कडवे टाकून व्हिडीओ बनवले जात आहेत. तशाच गावबंदी, मशाल मोर्चा, कँडल मोर्चा, तिरडी आंदोलन, नेत्यांचे पुतळे गावातल्या गावात जाळले जात आहेत. प्रत्येक कंटेंट हा गावस्तरावरून राज्यस्तरापर्यंत पोचवला जात आहे. त्यामुळे जसे प्रत्यक्ष आंदोलन सुरु आहेत तशीच धग सोशल माध्यमांद्वारे पेटवली जात आहे.
दरम्यान कधी नव्हे ते पहिल्यांदाच सोशल माध्यमामध्ये वैयक्तिक पोस्टच्या रिचमध्ये कमी दिसून येत असून फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारखे माध्यमांचे अल्गोरिथम ही मनोज जरांगे पाटील असो की मराठा आरक्षण आंदोलनाबाबतच्या पोस्टला मोठ्या प्रमाणावर व्यूव्हरशीप देत असल्याचं दिसून येतंय. हा कंटेंट सर्वत्रच चांगलाच गाजतोय. म्हणनूच आज सोशल माध्यमांचे महत्वही तेवढेच वाढलेले पाहायला मिळत आहे.
ही बातमी वाचा :