Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्या मान्य; संभाजीराजेंनी उपोषण सोडलं
Maratha Reservation: गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण खासदार संभाजीराजेंनी सोडलं आहे.
Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेली तीन दिवस सुरू असलेलं उपोषण हे खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सोडलं आहे. उपोषण स्थळी एका लहान मुलाच्या हातून रस घेऊन खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण सोडलं आहे. मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने हे उपोषण सोडत असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं.
खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने त्यांची भेट घेतली. त्यावेळी व्यासपीठावरच त्यांच्यामध्ये चर्चा झाली. लेखी आश्वासनाशिवाय हे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी मांडली होती. त्यानंतर मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करत असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
त्यानंतर खासदार संभाजीराजेंनी आपले उपोषण मागे घेत असल्याचं सांगितलं. त्यांनी पहिला व्यासपीठावर असलेल्या लहान मुलाच्या हातून रस घेत आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते रस घेतला. खासदार संभाजीराजेंसोबत त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनीही आपलं उपोषण सोडलं.
मराठा समाजाच्या खालील मागण्या झाल्या मान्य
- मराठा समाजातील युवकांना अधिकाधिक नोकऱ्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार.
- सार्थीचं व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून, 2022 पर्यंत त्याची पूर्तता करणार.
- सार्थी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार.
- सार्थी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रिमंडळासमोर ठेवणार.
- आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी दिले असून आणखी 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी निधी देणार.
- व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत.