Maratha Morcha : मराठा आरक्षणासाठी आज सोलापुरात आक्रोश मोर्चा, परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलक ठाम
Maratha Morcha : मराठा आरक्षणासाठी सोलापुरात आज, 4 जुलै रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा जाणार आहे.

सोलापूर : मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज, 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चासाठी खासदार छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे, रामदास आठवले यांना निमंत्रण दिलं होतं मात्र यांपैकी कुणीही मोर्चाला येणार नसल्याची माहिती असून नरेंद्र पाटील यांच्याच नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू होईल. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. तरी आंदोलक मोर्चा वर ठाम आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाईल असे सांगण्यात आले आहे. मात्र माहितीनुसार पोलीस चार पुतळा चौकात मोर्चा थांबवतील. शहरात 2 हजार ग्रामीण भागात 2 हजार पोलिसांचा फौजफाटा असणार आहे. शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात येत आहे. दरम्यान मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक राम जाधव, किरण पवार यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.
दरम्यान सोशल मीडियावर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली असल्याचे खोटे संदेश फिरत आहेत. पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मोर्चा, आंदोलनास मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त
कोरोनाचा संसर्ग पाहता प्रशासनाच्यावतीने या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. परवानगी नसली तरी मोर्चा काढण्यावर आंदोलक ठाम आहेत. त्यामुळे सोलापुरात आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोलापूर शहरात आज नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसातर्फे करण्यात आले आहे. दुसरीकडे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त शहर आणि ग्रामीण हद्दीत तैनात करण्यात येणार आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण मध्ये जवळपास 4 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. तर शहरात येणारे सर्व प्रमुख मार्ग पोलिसांच्या वतीने सील करण्यात येत आहेत. मोर्चा ज्या मार्गाने जाणार आहे त्या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत. बंदोबस्तामध्ये सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, एसआरपीएफच्या तुकड्या, होमगार्ड, सातारा, सांगली, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.
शांततेत मोर्चा काढणार आहोत, पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं- खासदार नाईक- निंबाळकर
मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने केंद्राकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी राज्यशासनाने उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा एक दिवस वाढवावा पण मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे. खासदार नाईक- निंबाळकर म्हणाले, राज्यशासनाने मागासवर्गीय आयोगामार्फत तात्काळ सर्वेक्षण पुर्ण करुन त्याचा अहवाल राज्यपालांकडे पाठवावा. तो अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवावा. त्यानंतर तो अहवाल पंतप्रधानांकडे आल्यानंतर केंद्रशासनाकडून मराठा आरक्षण मंजूर करुन घेण्याची जबाबदारी माझी आहे. मात्र ही प्रक्रिया पुर्ण न करता राज्यशासनाने थेट केंद्राकडे ही बोट दाखवणे बंद करावे असेही खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले.उद्या सोलापुरात होणाऱ्या मराठा आक्रोश मोर्चावेळी ग्रामीण भागातून येणाऱ्या मराठा तरुणांची अडवणूक किंवा दडपशाही केल्यास त्यामुळे होणाऱ्या उद्रेकास राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल. आम्ही नेहमीप्रमाणे शांततेत मोर्चा काढणार आहोत त्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
