(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावावर भूमिका काय? जरांगेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले, एकदम बेस्ट!
Manoj Jarange : राजकारणात काहीही होऊ शकतं, आपल्याला हलकं घेऊ नये असं सांगत प्रकाश आंबेडकरांच्या युतीच्या प्रस्तावावर 30 मार्च नंतर निर्णय घेतला जाईल असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
अकोला : महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) राज्यात तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. त्याचाच एक भाग म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंनाच (Manoj Jarange) सामाजिक युतीचा प्रस्ताव दिला आहे. आंबेडकरांच्या या प्रस्तावावर मनोज जरांगे हे सकारात्मक असल्याचं दिसतंय. आंबेडकरांचा प्रस्ताव हा चांगला असल्याचं सांगत येत्या 30 मार्चनंतर आपण निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
जालन्यातून मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी असं प्रकाश आंबेडकरांनी सूचवलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, आंबेडकरांचा प्रस्ताव हा चांगला आहे. राज्यातील कोणत्यात मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, राजकारणात यायचं नाही हे आपलं पक्कं आहे. आरक्षणासाठी समाजाने जे ठरवलंय ते करणार.
मनोज जरांगे म्हणाले की, काही लोकांचा आग्रह होता की, 7 मे रोजी ऐकलं नाही, यावेळी राजकारणात जाऊ. पण त्यावर समाजाने निर्णय घ्यायचा आहे. मी त्यांना सांगितलं की, प्रत्येक गावागावात जाऊन आपण निवडणुकीत जायचं का, एकच उमेदवार द्यायचा का हे दोनच प्रश्न विचारा. त्यानंतर जे काही उत्तर येईल त्यावर निर्णय घेऊ.
प्रकाश आंबेडकरांशी युती करणार का असा प्रश्न विचारल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले की, येत्या 30 तारखेनंतर काहीही होऊ शकतं. सामाजिक आंदोलनाचं अंग वेगळं असतं आणि राजकारण वेगळं असतं. समाजकारण करताना एकमत असतं, राजकारण करताना बहुमत लागतं. आपल्याला आंदोलनात हलकं घेतलं, सरकारच्या चुकीने या टोकालं आलं. त्यामुळे राजकारणात आपल्याला हलकं घेण्याची गरज नाही. आम्ही आतापर्यंत कुणालाच पाठिंबा दिला नाही, एकही उमेदवार जाहीर केला नाही.
प्रकाश आंबेडकरांच्याबद्दल आपल्याला नेहमीच आदर आहे आणि तो कायम राहणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांची तिसऱ्या आघाडीची चर्चा?
प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत जागावाटपावर चर्चा सुरू होती. मात्र आता ही बोलणी फिस्कटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी अखेर आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. त्याशिवाय, सांगली लोकसभेच्या जागेवर ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी म्हटले. तर समाजाशी बोलून 30 तारखेला पुढील निर्णय घेईन अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे.
ही बातमी वाचा: