जर-तरला अर्थ नाही, मुंबईकडे गाड्यांचे तोंड करून ठेवा; शिष्टमंडळाच्या भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया
Manoj Jarange : मराठा समाजासोबत झालेल्या चर्चेनंतरच पुढील निर्णय़ घेणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे ओबीसीमधूनच्या आरक्षणावर आपण ठाम असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत.
पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज पुन्हा एकदा भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहचले आहेत. मात्र, शिष्टमंडळासोबत कोणतेही चर्चा झालेली नाही. आपण आधी आंदोलकांशी चर्चा करणार आहोत, त्यानंतरच सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तर मराठा समाजासोबत झालेल्या चर्चेनंतरच पुढील निर्णय़ घेणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे ओबीसीमधूनच्या आरक्षणावर आपण ठाम असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत.
दरम्यान पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, जर-तरला अर्थ नाही, आंदोलकांना मुंबईकडे गाड्यांचे तोंड करून ठेवा असे सांगणार आहे. निर्णय झाला तर ठीक अन्यथा चलो मुंबई यासाठी आम्ही तयार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे, जरांगे आणि शिष्टमंडळात होणारी बैठक महत्वाची ठरणार आहे.
मुंबईला जाण्याची हौस नाही
आज शिष्टमंडळ माझ्या भेटीसाठी आले होते. सकाळी आठ वाजता हे शिष्टमंडळ आले. मात्र, मी 10 वाजता उठलो. परंतु, आमची कोणतेही चर्चा शिष्टमंडळाशी झालेली नाही. मी आधी आमच्या आंदोलकांशी चर्चा करणार आहोत. आमची चर्चा झाल्यावर शिष्टमंडळ यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आमच्या वाहनांचे तोंड मुंबईकडे करून ठेवले जाणार आहे. निर्णय झाल्यावर आम्ही पुढे जाणार नाही. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही, असेही जरांगे म्हणाले आहेत.
शिष्टमंडळ पुन्ह जरांगेंच्या भेटीला...
मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड हे सतत जरांगेंची भेट घेत आहे. दोन दिवसांपूर्वी मधुकरराजे आर्दड आणि छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी रांजणगाव गणपती येथे जरांगे यांची भेट घेतली होती. यावेळी, पहाटे चार वाजता चर्चेला सुरुवात झाली. दरम्यान, जरांगे यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्यावर निर्णय घेण्यासाठी आज पुन्हा शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला आले आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया...
मनोज जरांगे यांच्यासोबत ज्या काही चर्चा होत आहे, त्या सकारात्मक होत आहेत. त्यामुळे हे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. मराठा समाजाला सोयीसुविधा देण्याबाबतीत सरकार हात आखडता घेणार नाही. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता हा निर्णय सरकार घेणार आहे. कुणबी नोंदी शोधण्याचे काम देखील मोठ्याप्रमाणात सुरू आहे. यासाठी शिंदे समिती काम करत आहे. जर सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे. मात्र, सरकार सकारात्मक आहे, त्यामुळेच सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. तमाम मराठा समाजाला माझा आवाहन आहे की, हे सरकार तुमचंच असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: