Nashik News: नवीन गाडी नाहीच! धुळ्यातून धावतेय मनमाडकरांची 'गोदावरी एक्स्प्रेस'; प्रवाशांत तीव्र संताप
Nashik News : नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड येथून हजारो प्रवासी, नोकरदार रोज मुंबईत प्रवास करतात.
Nashik News : केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत धुळे ते दादर अशी नवी रेल्वे सुरु केली. धुळेकरांना मोठे गिफ्ट दिल्याचे सांगण्यात आले. मात्र ही नव्याने सुरु केलेली गाडी नसून सध्याची पर्यायी गोदावरी म्हणजे मनमाड- दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसच मनमाडहून धुळ्याला पळवून नेल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांत तीव्र संताप व्यक्त केला जात असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
धुळे रेल्वे स्थानकावरून 29 एप्रिल रोजी धुळे - दादर विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या उद्घाटन सेवेला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवला. आठवड्यातून तीन दिवस धुळ्याहून तर मध्ये गुरुवारची सुट्टी घेऊन तीन दिवस मनमाडहून ही गाडी धावणार असल्याचे आता स्पष्ट झाले. मात्र कोरोना प्रादुर्भावाचे कारण देवून दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची हक्काची, हमखास जागा मिळणारी व वेळेवर सुटणारी मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस बंद केली. ती आजपर्यंत पूर्ववत सुरू झालेली नाही. त्याऐवजी गोदावरीच्या वेळेत रेल्वे प्रशासनाने मनमाड- छत्रपती शिवाजी टर्मिनस ही स्पेशल ट्रेन मर्यादित कालावधीसाठी सुरू केली. सध्या ती गुरूवार वगळता मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर अशी धावत आहे.
दरम्यान सद्यस्थितीत धुळे-दादर अशी सुटणारी रेल्वे सोमवार, मंगळवार व शनिवारी धुळ्यावरून सकाळी 6.30 ला सुटेल. मनमाडला सकाळी 8.40 ला, नाशिकला 9.38 तर दादरला दुपारी 1.16 ला पोहचेल. दादर-धुळे ही गाडी रविवार, सोमवार व शुक्रवारी दादर येथून सायं. 4.15 ला निघेल.. नाशिकला सायंकाळी सात वाजून आठ मिनिटे मनमाडला रात्री आठ वाजून 40 वाजता तर धुळ्याला रात्री अकरा वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल उरलेले तीन दिवस म्हणजे मंगळवार बुधवार वर शनिवारी ही गाडी दादरहून मनमाड पर्यंत धावेत धुळ्याला जाणार नाही तर मनमाड दादर ही गाडी बुधवार शुक्रवार व रविवार या तीन दिवशी याच वेळेत धावणार आहे.
गाडी फलाटावर लागलीच नाही.....
सोमवारी धुळे मुंबई एक्सप्रेस मनमाड स्थानकात आली, तेव्हा गाडी तुंबळ गर्दी होती. त्यामुळे प्रवाशांनी या गाडीचा प्रवास स्थगित केला. लगेचच प्रति गोदावरी समजली जाणारे मनमाड-मुंबई समर स्पेशल गाडी सुटण्याची वेळ झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी धुळे-मुंबई गाडीला बाय बाय केला. पर्यायी गोदावरी समजल्या जाणाऱ्या मनमाड दादर एक्सप्रेसची प्रवासी वाट पाहत होते. पण ही समर स्पेशल गाडी फलाटावर लागलीच नाही. तेव्हा खऱ्या अर्थाने हा प्रकार प्रवाशांसमोर उघडला झाल्याचे समोर आले. नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड येथून हजारो चाकरमानी रोज मुंबई प्रवास करतात. गोदावरी त्यांची हक्काची गाडी होती, त्याला पर्यायी गोदावरी समर स्पेशल सुरू झाली ती आठवड्यातून तीन दिवस बंद झाल्याने संताप व्यक्त केला आहे.