(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वाघिणीच्या पाठीराख्यांनी आमच्या शेतात काम करून दाखवावं : गावकरी
वन्य प्राणी जितके महत्त्वाचे आहेत, तर मनुष्यप्राणी महत्त्वाचा नाही का? असा सवालही गावकऱ्यांनी विचारला आहे.
यवतमाळ : नरभक्षक वाघिणी अवनीला ठार केल्यानंतर प्राणीप्रेमींनी तिच्या हत्येबाबत प्रश्नचिन्ह उभे केले. मात्र स्थानिक नागरिकांनी या सर्व वाघिणीच्या पाठीराख्यांना उत्तर दिलं आहे. आमच्या गावात येऊन दाखवा, शेतात काम करून दाखवा, तेव्हा तुम्हाला आमच्या समस्या कळतील, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात नरभक्षक अवनी वाघिणीने तेरा लोकांचा बळी घेतला होता. त्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले. वाघिणीला ठार केल्यानंतर तिला ठार का मारलं? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. या सर्वांच्या प्रश्नावर स्थानिक गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
वन्यप्राणी महत्त्वाचे आहेत, मग मनुष्यप्राणी महत्त्वाचा नाही का? असा सवालही गावकऱ्यांनी विचारला आहे. आमच्या भागात जिथे वन्यप्राण्यांचा धुडगूस आहे, त्या भागातील जंगलांना किंवा शेतांना सौरकुंपण दिले तर वन्यप्राणी हल्ले होणार नाही, असा सल्लाही गावकऱ्यांनी दिली.
नरभक्षक वाघिणीच्या हल्ल्यात यवतमाळचे गजानन पवार ठार झाले होते. त्यानंतर मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने गजानन यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. गजानन यांना 2 मुली आहेत. अशारीतीने नरभक्षक वाघिणीच्या हल्लाने आमचं अवघं कुटुंब उद्ध्वस्त झालं, अशी प्रतिक्रिया इंदू पवार यांनी दिली.
वाघिणीला ठार मारल्यानंतर या भागात काहीशी भीती कमी झाली आहे. मात्र येथील भागात अनेक वन्यप्राणी आहे. त्यांच्याकडून होणारे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे, असंही या भागातील नागरिकांनी म्हटलं.