Majha Sanman 2022 : अशोक सराफ, राणी बंग, रितेश देशमुख यांच्यासह नऊ जणांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
Majha Sanman 2022 : एबीपी माझाकडून देण्यात येणारा 'माझा सन्मान' 2022 पुरस्कार सोहळा आज आणि उद्या म्हणजे 14 आणि 15 ऑगस्ट रोजी तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात. एबीपी माझावर संध्याकाळी 6 ते 8 या सोहळ्याचे प्रक्षेपण होणार आहे.
Majha Sanman 2022 : एबीपी माझाच्या यंदाच्या 'माझा सन्मान' पुरस्कारांचे वितरण झालं असून प्रख्यात अभिनेते अशोक सराफ, जेष्ठ समाजसेविका राणी बंग, अभिनेता रितेश देशमुख, कोविड टास्कचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्यासह नऊ जणांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. एबीपी माझाचा हा सोहळा 3 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गौर गोपालदास महाराज आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना 'माझा सन्मान' बहाल करण्यात आला. ज्यांनी आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवला, महाराष्ट्रासह देशानंही ज्यांच्या कार्याची दखल घेतली अशा गुणीजनांना 'माझा सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
एबीपी माझाकडून देण्यात येणारा 'माझा सन्मान' 2022 पुरस्कार सोहळा आज आणि उद्या म्हणजे 14 आणि 15 ऑगस्ट रोजी तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात. एबीपी माझावर संध्याकाळी 6 ते 8 या सोहळ्याचे प्रक्षेपण होणार आहे.
'माझा सन्मान' पुरस्काराचे मानकरी
- डॉ. संजय ओक, कोविड टास्कचे प्रमुख
- विलास शिंदे, सह्याद्री फार्म्सचे प्रणेते
- विजय रघुवीर, प्रख्यात जादूगार
- अमृता सुभाष, ख्यातनाम अभिनेत्री
- आशुतोष कोतवाल, ख्यातनाम शास्त्रज्ञ
- रितेश देशमुख, अभिनेता
- पंडित सुरेश तळवलकर, तबला उस्ताद
- डॉ. राणी बंग, सामाजिक कार्यकर्त्या
- अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते
अशोक सराफ
अशोक सराफ अर्थात आपल्या साऱ्यांचेच लाडके अशोक मामा. मामांबद्दल बोलू तेवढं कमीच. कधीकाळी एकांकिकेच्या मंचावरुन अभिनयाची कारकिर्द सुरु केलेला हा अभिनेता आज मराठी मनोरंजन विश्वातला अनभिषिक्त सम्राट आहे. कितीतरी सिनेमे, कितीतरी नाटकं, कितीतरी मालिका मामांनी आपल्या अभिनयानं सजवल्या आहेत… अजरामर केल्यात…
अशोक मामांचं केवळ समोर असणंच प्रेक्षकांच्या ओठांवर हसू खुलवणारं असतं… मन प्रसन्न करणारं असतं… त्यांच्या अभिनयातली हिच सकारात्मकता, सहजता आपल्या साऱ्यांनाच भावते.
विलास शिंदे
विलास विष्णू शिंदे हे सह्याद्री या देशातील सर्वात मोठ्या द्राक्ष निर्यातदार कंपनीचे प्रणेते आहेत. शेती विषयातील पदवी मिळवून प्रत्यक्ष शेतीत राबणारे फार कमी असतात आणि शेतीत राबून त्यातून करोडोंची उलाढाल करणारे विलास शिंदेंसारखे मात्र एकमेव असतात.
प्रसंगी घरच्यांचा विरोध पत्करला… शेतीचा ध्यास घेतला आणि त्यातूनच जन्म झाला शंभर टक्के शेतकऱ्यांची मालकी असलेल्या सह्याद्री फार्मर्सचा… शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव आणि ग्राहकाला सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न ही सह्याद्री फार्मर्सची वैशिष्ट्य … त्यामुळेच आतापर्यंत 42 देशांत या ब्रँडला पसंती मिळालीय… तब्बल अकरा हजार शेतकरी जोडले गेलेत… साडे तीन कोटींच्या गुंतवणुकीतून त्यांनी आज साडे सातशे कोटींची झेप घेतलीय…
कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक
डॉ. संजय ओक हे विख्यात शल्यविशारद, बालरोगतज्ज्ञ आहेत. वैद्यकविश्वातलं अत्यंत आदरानं घेतलं जाणारं नाव, 1977 साली एमबीबीएसची पदवी घेऊन त्यांनी आरोग्यसेवेला सुरुवात केली आणि त्यानंतर आज कित्येक मानाच्या पदव्या त्यांच्या नावापुढे लागल्या आहेत तर कित्येक महत्वाच्या जबाबदाऱ्या तेवढ्याच निष्ठेनं पेलल्यात, केईएमचे डीन, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरु, प्रिन्स अली खान हॉस्पिटलचे सीईओ या पदांवर काम करताना त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं आहे. वैद्यकविश्व त्यांना जेवढं उत्तम शल्यविशारद म्हणून ओळखतं तेवढंच साहित्यविश्व त्यांना उत्तम लेखक म्हणून ओळखतं. त्यांची 50 हून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. अर्थात डॉ. ओक यांचा हा प्रवास मोठा असला तरी कोरोनाच्या संकटात कोविड टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून त्यांनी आणि त्यांच्या 9 डॉक्टर्सच्या टीमने केलेलं काम कोणीच विसरु शकत नाही. त्यांच्या अचूक नियोजनामुळेच त्या महाभयंकर संकटाचा आपण यशस्वीपणे सामना करु शकलो. त्यांच्या याच कार्यासाठी कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना एबीपी माझातर्फे अत्यंत आदराने 'माझा सन्मान' पुरस्कार प्रदान करत आहे.
डॉ. आशुतोष कोतवाल
डॉ. आशुतोष कोतवाल हे जगविख्यात मूलकण शास्त्रज्ञ आहेत. डब्ल्यू बोसॉन या मूलकणाचे वस्तूमान अधिक अचूकतेने मोजण्यात ज्या टीमला यश आलं त्या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. कोतवाल हे मराठमोळे शास्त्रज्ञ आहेत. डॉ. आशुतोष कोतवाल आणि टीमचं हे संशोधन भौतिकशास्त्रातलं या दशकातील सर्वात मोठं संशोधन मानलं जातंय, कारण विश्वाची रचना आणि त्याच्या जडणघडणीचे रहस्य जाणून घेण्यासाठी डब्ल्यू बोसॉन हे मूलकण अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणूनच या संशोधनाची दखल विज्ञानविश्वातल्या सर्वात प्रतिष्ठित सायन्स नियतकालिकानं थेट कव्हर स्टोरीच्या रुपात घेतलीय.
मूळचे पुणेकर असलेले डॉ. आशुतोष सध्या अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ज्ञानदानाबरोबरच संशोधनाचं मोठं काम त्यांनी कित्येक वर्षांपासून हाती घेतलंय. जगातल्या महत्वाच्या मूलकण संशोधकांमध्ये ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं अशा या मराठमोळ्या डॉ. आशुतोष यांना ‘'माझा सन्मान' पुरस्कार’ अभिमानानं प्रदान करत असताना अपेक्षा एवढीच की त्यांच्या रुपानं पहिला मराठमोळा नोबेल पुरस्कार विजेता या महाराष्ट्रभूमीला मिळावा!
जादूगार विजय रघूवीर
जादूगार विजय रघूवीर यांच्या जादुई विश्वात लहानांपासून थोरांपासून सारेच रमले. वडिलांकडून मिळालेला वारसा समर्थपणे पेलत इंजिनिअर असलेल्या विजय रघूवीर यांनी या कलेचा आवाका कल्पनेपलिकडे नेला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी रंगमचांवर अक्षरश: ‘जादुई मायाजाल’ उभं केलं.
आजवर या मायाजालात जगभरातल्या 27 देशांमधले रसिक न्हाऊन निघालेत… हजारो प्रयोगांना हाउसफुलचे बोर्ड झळकलेत… विजय रघुवीर यांनी त्यांची जादूची कला तर जपलीच आहे. पण या जादूच्या कलेला शासनदरबारी स्थान मिळावं, इतर कलांसारखा दर्जा मिळावा म्हणूनही प्रयत्न केलेत.
जादुगार विजय रघुवीर यांच्या याच अविरत कलासेवेसाठी, या कलेवर केलेल्या अपार प्रेमासाठी 'माझा सन्मान' पुरस्काराने गौरवण्यात येत आहे.
अमृता सुभाष
अमृता सुभाष म्हणजे अभिनयाचा समृद्ध वारसा लाभलेली गुणी अभिनेत्री. नाट्यकर्मींचं गुरुकुल अर्थात नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये साक्षात सत्यदेव दुबेंकडून अभिनयाचे संस्कार तिच्यावर झाले आणि पुढच्या भरारीची बिजं तिथंच रोवली गेली.
श्वास हा तिचा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करसाठी भारताकडून पाठवला गेला. छोट्या पडद्यावरची चिन्मयी आणि रंगभूमीवरची ही फुलराणी ओटीटीच्या नवमाध्यमातही तितक्याच ताकदीनं झळकली… (सेक्रेड गेम्स) ज्या भूमिकेसाठी संघर्ष करावा लागेल तेच स्विकार असा नसिरुद्दीन शहांनी दिलेला गुरुमंत्र तिने कसोशीने पाळलाय… तिच्या आजवरच्या प्रत्येक कामात त्याची झलक दिसते.
रितेश देशमुख
रितेश देशमुख हा बॉलिवुडविश्वातला आघाडीचा मराठमोळा अभिनेता आहे. कधी त्याच्या लव्हस्टोरीने चाहत्यांना प्रेमात पाडलं… कधी त्याच्या विनोदाने खळखळून हसवलं… तर कधी त्याच्यातल्या खलनायकानं थरारुन सोडलं.
घरची पार्श्वभूमी राजकीय पण रितेशचा ओढा कलेकडे…. पदवी घेतली तिही स्थापत्यशास्त्रात… पण तिथेही तो फार रमला नाही… कारण त्याला खुणावत होता अभिनय… आणि ती संधी त्याला मिळाली तुझे मेरी कसम या सिनेमातून… सोबत होती जिनिलिया… जिची सोबत त्याला पुढे आयुष्यभर लाभणार होती.
या पहिल्या सिनेमानं आत्मविश्वास दिला आणि मग रितेशनं मागे वळून पाहिलंच नाही… भूमिका विनोदी असो वा रोमॅण्टिक… अॅक्शन असो व्हिलन… रितेशनं लक्षात राहाण्यासारखा परफॉर्मन्स दिला. अर्थात हिंदीत गेला म्हणून तो मराठीला विसरला नाही. मराठी सिनेमांमध्ये कधी तो हिरो म्हणून झळकला तर कधी उत्तम सिनेमांच्या मागे निर्माता म्हणून खंबीरपणे उभा राहिला…
पंडित सुरेश तळवलकर
पंडित सुरेश तळवलकर हे तबल्याचा ताल आणि गाण्याची लय यांचा सर्वांगसुंदर मेळ घालणारे तालयोगी.
सलग आवर्तनाच्या मालिकेतून लयीशी खेळत ते जेव्हा सम गाठतात तेव्हा रसिकांच्या ओठातून आपोआपच उद्गार निघतात वाह पंडीतजी. अर्थात या मागे आहे त्यांची साधना आणि या कलेवर असलेली अपार श्रद्धा.
बालपणी थेट वडिलांनीच तबल्याचे संस्कार केले आणि पुढे पंडित पंढरीनाथ नागेशकर, पंडित विनायकराव घांग्रेकर यांच्याकडून ही कला अंगात भिनवली.आजवर अनेक दिग्गजांना त्यांनी संगीतसाथ केलीय तर ही परंपरा पुढे घेऊन जाणारे अनेक शिष्योत्तम घडवलेत. पद्मश्री, संगीत नाटक अकादमीसारख्या असंख्य मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा शिरपेच सजलाय.