Majha Katta : एक मुंगीसुद्धा प्रचंड पर्वत पार करु शकते, तेवढी जिद्द तुमच्यात असायला पाहिजे: लता करे
Majha Katta : पतीच्या उपचारासाठी वयाच्या 65 व्या वर्षी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणाऱ्या आणि अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या लता करे (Lata Kare) यांचा जीवनप्रवास 'माझा कट्ट्या'वर उलघडण्यात आला.
Majha Katta : आपल्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्या त्यांच्या पतीचा जीव वाचवण्यासाठी काहीही करु शकतात. वट सावित्रीची उपवास करणारी महिला वेळ आली तर पतीसाठी काहीही करू शकते याचा अनुभव अनेकदा आला आहे. वयाच्या पासष्ठी नंतर महिलांना आराम करायचा सल्ला दिला जातो. पण याच वयाच्या लता करे (Lata Bhagwan Kare) यांनी त्यांच्या पतीच्या उपचारासाठी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकली. एक मुंगीसुद्धा प्रचंड पहाड पार करु शकते, तेवढी जिद्द तुमच्यात असायला पाहिजे असा संदेश लता करे यांनी दिला आहे. बारामती मॅरेथॉन स्पर्धा सलग तीन वेळा जिंकणाऱ्या लता करे यांनी नुकतंच एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्या'वर हजेरी लावली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
लता करे यांच्या संघर्षाचा प्रवास लता भगवान करे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटात स्वत: लता करे यांनी काम केलं असून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हैदराबादच्या नवीन देशबोनाई यांनी केलं आहे. नवीन देशबोनाई हे देखील माझा कट्ट्यावर आले होते. त्यांनीही या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास एबीपी माझाच्या प्रेक्षकाशी शेअर केला.
लता भगवान करे या बारामती तालुक्यातील रहिवासी आहेत. 2014 साली त्यांच्या पतीवर उपचारासाठी पाच हजार रुपयांची गरज होती. पण तेवढे पैसे नसल्याने त्यांच्यासमोर मोठी अडचण होती. मग त्यांना बारामती मॅरेथॉनच्या स्पर्धेबद्दल ऐकलं. त्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्यास पाच हजार रुपयांचं बक्षीस मिळणार होतं. त्यामुळे लता करे यांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांनी ही स्पर्धा जिंकली. मिळालेल्या पैशातून त्यांनी त्यांच्या पतीवर उपचार केले. विशेष म्हणजे लता करे यांनी सलग तीन वर्षे या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला.
लता करे यांच्या संघर्षाची बातमी पेपरमध्ये छापून आली. इनाडू या वृत्तपत्रामध्ये ही बातमी हैदराबादच्या नवीन देशबोनाई यांनी वाचली आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यावर चित्रपट काढायचं ठरवलं. पतीवर उपचार करण्यासाठी एक 65 वर्षाची महिला तीन किमी धावली ही गोष्ट त्यांच्या मनाला भिडली. नवीन देशबोनाई हे लता करेंच्या शोधात बारामतीमध्ये आले. पुरेसे पैसे नसले तरी लता करे यांच्यावर चित्रपट तयार करायचाच हा निर्धार त्यांनी केला.
लता करे यांच्या संघर्षावर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात सर्व पात्र खरे आहेत. या चित्रपटातील बहुतांश सिन हे खरे आहेत, हा चित्रपट 120 स्क्रिन्सवर रीलीज झाला आहे. लवकरच हा चित्रपट आता अमेझॉन प्राईमवर रिलीज होत आहे. लता करे यांना या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
दिग्दर्शक नवीन देशबोनाई हे 1947 सालच्या बंगाल दुष्काळावर एक चित्रपट तयार करत आहेत. लता करे या त्या चित्रपटात काम करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Majha Katta : गुंतवणुकीतून कोणी मोठ्या परताव्याचं आमिष दाखवत असेल तर सावध व्हा; शोधपत्रकार सुचेता दलाल यांचा इशारा
- भाषेचा अट्टहास हा संस्कृती जपण्यासाठी नाही तर संवाद वाढविण्यासाठी केला पाहिजे : मॅक्सिन मावशी
- कसाबला फाशी देण्यापूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची सूचना काय होती? मीरा बोरवणकर यांनी सांगितली आठवण