Majha Katta: एका उत्तुंग माणसाची गाथा लोकांसमोर आणायची होती, 'महाराष्ट्र शाहीर'च्या निमित्ताने केदार शिंदे आणि अंकुश चौधरीसोबत संवाद
Majha Katta: आपण हरायचं नाही, आापण थांबायचं नाही, चालत राहायचं असा संदेश शाहीर साबळेंनी त्यांच्या जीनवातून दिल्याचं केदार शिंदे यांनी सांगितलं.
Majha Katta: एका उत्तुंग माणसाची गाथा पडद्यावर मांडायची होती, त्यामुळे शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर चित्रपट काढला, त्यांची जीवनगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडल्याचं या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितलं. अभिनेता अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे हे एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी दिलखुलास संवाद साधला.
शाहीर साबळेंच्या आयुष्यावर आधारित असलेल्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं असून अंकुश चौधरी याने त्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. गुरु ठाकुरचे अप्रितम शब्द आणि अजय-अतुलचे भन्नाट संगीत यामुळे हा चित्रपट सुंदर झाल्याचं केदार शिंदे यांनी सांगितलं.
शाहीर साबळे यांची एक आठवण सांगताना केदार शिंदे म्हणाले की, शिवसेना स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये शाहीर साबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचा मराठीबद्दलचा त्रागा होता, मराठी माणसाच्या हक्काबद्दल मत होतं त्यामुळे त्यांनी आक्रमकपणे यामध्ये सहभाग घेतला. मात्र नंतरच्या काळात राजकारणाचा अतिरेक झाल्यानंतर ते हळूहळू त्यापासून दूर झाले.
शाहीर साबळे हे अप्रतिम मटन बिर्याणी बनवायचे, सकाळचा नाश्ता हा तेच करायचे अशी आठवण केदार शिंदे यांनी सांगितलं. आपण हरायचं नाही, आापण थांबायचं नाही, चालत राहायचं असा संदेश शाहीर साबळेंनी त्यांच्या जीनवातून दिल्याचं केदार शिंदे यांनी सांगितलं.
जेजुरीच्या खंडेराया कसं सूचलं?
केदार शिंदे हे शाहीर साबळेंची एक आठवण सांगताना म्हणाले की, शाहीर साबळे हे एकदा साताऱ्याहून पुण्याला येत असताना सातारा एसटी स्टँडवर त्यांच्या कानावर एक ओळ पडली. एक मुरळी त्या स्टॅंडवर गात होती, जेजुरीच्या खंडेराया जागराला या या. हे ऐकताच बाबा त्या ठिकाणी गेले आणि त्या मुरळीला पैसे दिले आणि पुढची ओळ काय ते विचारलं. बाबांनी त्या पुढच्या दोन ओळी या एसटी तिकिटावर लिहिल्या, वाईच्या तू गणराया जागराला या या, पसरणीच्या भैरीदेवा जागराला या या असं लिहिलं आणि पुढे ते गाणं आजरामर झालं.
केदार शिंदे म्हणाले की, या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश चौधरीने वजन कमी केलं होतं. त्यावेळी अनेकजणांनी आपल्याला विचारलं, अंकुशला काही झालंय का? पण आम्ही त्याबाबतीत सिक्रसी ठेवली. दिसणं हा पहिला क्रायटेरिया होता. त्यामुळे हे सर्व करावं लागलं.
गाणं गायचा हा प्रसंग आव्हानात्मक आणि भावलेला
या चित्रपटातील सर्वात भावलेला प्रसंग कोणता असं विचारल्यानंतर अंकुश चौधरी म्हणाला की, मला फेटा बांधून गायला लावलं आणि त्यावेळी फोटोशूट केलं गेलं, हा प्रसंग सर्वात भावल्याचं अंकुश चौधरी म्हणाला. 20 वर्षांपूर्वीचे साबळे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो पाहिल्यानंतर त्यांची ती वेगळी स्टाईल लक्षात घेतली आणि त्यावर काम केलं असं तो म्हणाला.