Majha Katta | आयुष्यात सकारात्मकता ठेवा, सगळ्या संकटावर मात करता येईल: शल्यविशारद डॉ. पीएस. रामाणी
Majha Katta | रुग्णांना 'ताठ कणा' देणारे डॉक्टर अशी ख्याती असणारे डॉ. पीएस रामाणी यांच्याशी माझा कट्टा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मारलेल्या खास गप्पा.
Majha Katta : आयुष्यात सकारात्मकता ठेवाल तर सर्व संकटावर मात करता येईल. मनाची शक्ती प्रबळ पाहिजे, मी मनात आलेली गोष्ट करणारच असा आत्मविश्वास असेल तरच यश मिळेल असं जगविख्यात शल्यविशारद डॉ. पीएस. रामाणी यांनी सांगितलं. ते एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. प्रेमानंद शांताराम अर्थात पीएस. रामाणी यांचा जन्म गोव्यातल्या छोट्याशा गावातला. अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन जागतिक किर्तीचे न्यूरोसर्जन म्हणजे शल्यविशारद म्हणून त्यांनी नाव कमावलं आहे. त्यांनी मुंबईतील सायन रुग्णालयात न्यूरो सर्जन विभाग सुरू केला आणि ते तळागाळातल्या रुग्णांसाठी देवदूत ठरले.
'ताठ कणा' या त्यांच्या आत्मचरित्रात डॉ. रामाणी यांचा जीवनप्रवास उलघडला गेलाय. त्यांचा आजवरचा संघर्षमय आणि तितक्याच प्रेरणादायी जीवनावर आता एक सिनेमाही येऊ घातलाय.
वैद्यकिय विश्वातला सर्जनशील 'सर्जन'
डॉ. पीएस. रामाणी यांनी पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेत मोलाचं संशोधन केलं आहे. वयाच्या 83 व्या वर्षापर्यंत त्यांनी शंभर मॅरेथॉन धावले आहेत. तसेच त्यांनी सत्तरहून अधिक पुस्तकांचे लेखन केलं आहे. डॉ. पीएस. रामाणी यांना न्यूरो स्पायनल सर्जरीचे जनक मानलं जातंय.
वयाच्या 83 व्या वर्षीही एवढा उत्साह कसा असा प्रश्न विचारल्यानंतर डॉ. पीएस. रामाणी म्हणाले की, "माझी जीवनशैली सकारात्मक आहे. मी रात्री कितीही वाजता झोपलो तरी पहाटे पाच वाजता उठतो. त्यानंतर मेडिटेशन करतो. त्यामुळे माझा मेंदू शांत राहतो आणि पॉझिटिव्ह विचार निर्माण होतात. त्यानंतर पाच प्रकारचे प्राणायम केल्यामुळे फुफ्फसे चांगले राहतात."
डॉ. पीएस. रामाणी पुढे म्हणाले की, "मी आजही न चुकता सकाळी जॉगिंग करतो, व्यायाम करतो. आपल्या मनाची शक्ती प्रबळ पाहिजे, कोंणतीही गोष्ट मी करणारच असा विचार असेल तरच यश नक्की मिळते. मनाच्या शक्तीमुळे या वयातही मला कोणताही आजार नाही. आतापर्यंत मी अनेक कोरोनाच्या टेस्ट केल्या पण त्या सगळ्या निगेटिव्ह आल्या आहेत.
कोरोनाची लस प्रत्येकाने घ्यायलाच हवी, त्यावर शंका नको."
नवरदेव थेट हॉस्टेलवरून लग्नाच्या मंडपात
आपल्या लग्नाबद्दल बोलताना डॉ. पीएस. रामाणी म्हणाले की, "लहानपणी ग्रामीण भागातली परिस्थिती पाहून डॉक्टर व्हायचं ठरवलं. लंडनला एमएसच्या शिक्षणासाठी जायचं ठरवल्यानंतर तिकडे जाऊन इंग्लिश मुलीच्या फंद्यात पडायचं नाही असं ठरवलं. त्यामुळे मामाच्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी हॉस्टेलला राहायचो. नवरदेव थेट हॉस्टेलवरून लग्नाच्या मंडपात गेला. आम्ही लग्न केल्यानंतर मी परत हॉस्टेलला आलो आणि मामाची मुलगी तिच्या घरी गेली.
गोव्याच्या लोकांची सेवा करण्याचं पक्कं
डॉ. पीएस. रामाणी म्हणाले की, "लंडनला साडे पाच वर्षे होतो. त्यावेळी 'रिसर्च मॅन ऑफ द इयर' या पुरस्कारासाठी निवड झाली. मुलाखतीला न जाताही अमेरिकेतून नोकरीची ऑफर आली होती. पण गोव्याला जायचं आणि तिकडच्या लोकांची सेवा करायची हे मनात पक्कं केलं होतं."
डॉ. पीएस. रामाणी पुढे म्हणाले की, "भारत सरकारच्या एका योजनेचा फायदा घेऊन भारतात आलो आणि मुंबईतील केईएम, सायन आणि नायर हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जनमध्ये काम करू लागलो. थोड्या दिवसानंतर गोव्याला गेलो आणि तिकडं काम सुरू केलं. काही काळ गोव्यातील लोकांची सेवा केली आणि समाधान मिळवलं. त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही नवीन करण्यासाठी आणि व्यापक प्रमाणात लोकांची सेवा करण्यासाठी मुंबईला आलो. सायन हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जन विभाग नव्हता, त्या ठिकाणी या विभागाची निर्मीती केली."
स्लिप सर्जरी संशोधनामुळे काय परिवर्तन?
ज्याचा पाठीचा कणा तुटला आहे त्याला आपल्या संशोधनाचा फायदा झाल्याचं डॉ. पीएस. रामाणी म्हणाले. त्यासाठी त्यांनी देशातील अग्रगण्य सर्जिकल कंपन्यांशी चर्चा केली आणि आवश्यक ते साहित्य तयार करून घेतलं. डॉ. पीएस. रामाणी म्हणाले की, "कधीकधी मणका लूज असतो, वजन वाढलं तर मणक्यावर ताण पडतो आणि तो तुटतो. त्यासाठी स्लिप सर्जरी शोधून काढली आणि त्याला जगाची मान्यता मिळाली. मुख्य म्हणजे रुग्णांना उत्तर मिळालं. स्लिप सर्जरी म्हणजे कणा बांधणे. ज्या ठिकाणी कणा तुटला आहे त्या ठिकाणी स्क्रू लावला जातो. बाहेरून रॉड लावला जातो."
सायन हॉस्पिटलमध्ये आशियातील पहिली बोन व्हेन तयार केल्याचं डॉ. पीएस. रामाणी यांनी सांगितलं. मृत शरीरातून कमरेच्या हाडाचा तुकडा काढून घ्यायचा आणि त्याचा वापर स्लिप सर्जरीमध्ये केला जायचा असंही ते म्हणाले.
आजही या वयात कोणतेही ऑपरेशन करताना माझे हात थरथरत नाही, माझे हात स्थिर असतात. त्यावर अनेकजण आश्चर्य व्यक्त करतात असं डॉ. रामाणी म्हणाले. जर तुम्ही स्वत: ला मदत केली तर देवही तुम्हाला मदत करतो असं मत त्यांनी व्यक्त केलं.
आव्हानात्मक ऑपरेशन
कमल हसनच्या बायकोचं, सारिकाचं दोन वेळा ऑपरेशन केल्याचं डॉ. पीएस. रामाणी यांनी सांगितलं. तिचे पहिल्यांदा ऑपरेशन केल्यानंतर एका अपघातात तिचा कणा पुन्हा दुखावला. त्यावेळी तिचे पुन्हा ऑपरेशन करावं लागलं. ते ऑपरेशन नाजूक असल्याने त्याला 20 तास लागले. त्यावेळी भयंकर टेन्शन आलं होतं. पण सारिका एका आठवड्यात बरी झाली असं सांगत डॉ. पीएस. रामाणी यांनी आपल्या आयुष्यातील हे आव्हानात्मक ऑपरेशन असल्याचं नमूद केलं.
अलिकडे स्लिप डिस्क हा आजार अनेकांना होतोय. तो जर टाळायचा असेल तर प्रत्येकाने व्यायाम करणे आवश्यक आहे. तसंच वजन आटोक्यात ठेवणं गरजेचं आहे असं डॉ. रामाणी यांनी सांगितलं.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाच्या रुग्णसंख्येत जास्त वाढ आहे. पण हा कोरोनाचा म्युटेशन हा तुलनेने दुर्बल आहे. कोरोना कधीच जाणार नाही पण नंतर याची सवय होऊन तो साधारण होईल. त्यामुळे लोकांनी सकारात्मता बाळगली पाहिजे, व्यायाम, प्राणायम केलं पाहिजेत. काही झालं तर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घ्यावेत असे