(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महायुती सरकारला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विसर? गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!
Bhandara : गोसीखुर्द येथे होत असलेल्या महत्वकांशी प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी लावण्यात आलेल्या फलकावर जलसंपदा मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव कुठेही नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
Bhandara News भंडारा : राज्यातील महायुतीच सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विसरले का? असा प्रश्न विचारण्यामागचे कारण म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोसीखुर्द (Gosekhurd Dam) धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आज महत्त्वकांक्षी जल पर्यटन प्रकल्पाचा भूमिपूजन करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जलसंपदा विभागाच्या वतीने संयुक्तरित्या या महत्वकांशी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न होत आहे. असे असताना आज होत असलेल्या या जल पर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी लावण्यात आलेल्या फलकावर जलसंपदा मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा नाव कुठेही नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
विशेष म्हणजे या फलकावर भंडाराचे पालकमंत्री म्हणून विजयकुमार गावित, (Vijaykumar Gavit) उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत (Uday Samant) यांचे नाव आहे. तर परिसरातील लोकप्रतिनिधी म्हणून प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, प्रशांत पडोळे आणि अनेक आमदारांचे नाव फलकावर होते. मात्र जलसंपदा विभागाची जबाबदारी सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव कुठेही फलकावर नसल्याने अनेक चर्चेला उधाण आले आहे.
जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसांचं नावच गायब!
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara News) दौऱ्यावर आहेत. दरम्यान, वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. रेल्वे मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा होत आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देणारा असून अनेक रोजगाराच्या संधी ही निर्माण करणारा ठरणार आहे. त्यामुळे या महत्वकांशी प्रकल्पाची साऱ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे. या प्रकल्पासाठी 102 कोटींचा पहिला टप्पा प्राप्त झाला असून त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होत आहे. मात्र जलसंपदा विभागाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे आणि महायुती मधील प्रमुख नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव कुठेही फलकावर नसल्याने अनेक चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे जलसंपदा विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव आणि पर्यटन विभागाचे सचिव यांचे नाव सुद्धा फलकावर होते. त्यामुळे प्रशासन देवेंद्र फडणवीस यांचा नाव लिहिण्यास विसरले की यामागे दुसरं काही कारण आहे, हे अजून स्पष्ट नाही. मात्र नक्कीच या प्रकारामुळे भाजपचे स्थानिक नेते या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा मुद्दा प्रशासनासाठी अडचणीचा ठरण्याची ही दाट शक्यता आहे.
गोशीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे मुख्यमंत्र्यांच्या समोर घोषणाबाजी
गोशीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना मागील दोन वर्षापासून मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप भेट देत नसल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्या मागण्यांना घेऊन या प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅन मध्ये कोंबून नेलं. हा सर्व प्रकार भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेदरम्यान घडला.
इतर महत्वाच्या बातम्या