Ambadas Danve : राज्याच्या गृहमंत्र्यांनी जणाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे; पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी अंबादास दानवेंची बोचरी टीका
राज्य सरकारने काहीतरी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि या प्रकरणी आपली नामुष्की मान्य केली पाहजे. अशा शब्दात अंबादास दानवे यांनी पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि अपघातांच्या मालिकेमुळे पुण्याचे नाव आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. अशातच एफसी रोडवरील (FC Road) नामांकित हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची (Drugs) नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील लिक्वीड लिजर लाउंजमध्ये उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल (Sandeep Gill) यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण देखील तापले असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला आहे.
गृहमंत्र्यांनी जणाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे
ठाकरे गटाचे माजी नगरसवेक अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी रोजी निर्घुण हत्या झाली होती. त्यानंतर लगेच काही दिवसानंतर उल्हासनगरमधील एका पोलीस ठाण्यात भाजप आमदारानेही एकावर गोळीबार केला होता. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली होती. या मागणीवरून फडणवीसांनी प्रत्युत्तर देत गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील असे वक्तव्य केले होते. आता त्याच मुद्द्याला धरून अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, त्यांनी मागे म्हटल्या प्रमाणे गाडीखाली एखादा कुत्रा जरी आला तरी राजीनामा मागितला जातो. आता जनाची नाही तर मनाची त्यांनी ठेवली पाहिजे. रोज रोज राज्यात अनेक प्रकार घडत आहे. पुण्याचं नाव आज बदनाम होत आहे. राज्य सरकारने काहीतरी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि या प्रकरणी आपली नामुष्की मान्य केली पाहजे. अशा शब्दात अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी महायुतीचा 41 चा स्ट्राईक रेट 17 वर आणला
राज्यात अद्याप आचारसंहिता असल्याने अनेक काम पेंडीग पडले होते. त्यामुळे आज जिल्हा परिषद येथे सीइओ यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठक चांगली झाली असून, ज्या काही योजना थांबल्या होत्या यावर चर्चा झाली. जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि अधिवेशनात यावर प्रश्न मांडला जाईल. असेही अंबादास दानवे यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावरही टीका केलीय. संजय शिरसाट यांच्यासारखी भाषा मला येणार नाही. पण संजय राऊत यांनी महाविकास आघाडी एकत्र करून तुमची महायुती ज्याचा 41 चा स्ट्राईक रेट होता तो 17 वर आणला आहे. यापेक्षा जास्त काही बोलणं गरजेचं नाही. असेही अंबादास दानवे म्हणले.
इतर महत्वाच्या बातम्या