एक्स्प्लोर
राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन, 150 व्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम
राज्यात देखील जागोजागी महात्मा गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन केले जात आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी रॅलींचे आयोजन करण्यात आले तर या निमित्ताने स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली.
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेत्यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गाधींना अभिवादन केलं. दुसरीकडे राज्यात देखील जागोजागी महात्मा गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन केले जात आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी रॅलींचे आयोजन करण्यात आले तर या निमित्ताने स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली.
गडचिरोली पोलीस दलातर्फे अहिंसा रॅलीचं आयोजन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात नक्षल्यांनी केलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्येच्या निषेधार्थ गडचिरोली पोलीस दलातर्फे अहिंसा रॅलीचं आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी शेखर सिंग, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हिरवी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. ह्यावेळी संपूर्ण विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी, गडचिरोलीकर मोठ्या संख्येने सहभागी होते. या रॅलीद्वारे अहिंसेचा संदेश दिला आणि नक्षल्यांच्या क्रूर नीतीचा निषेध केला.
सेवाग्राम आश्रम परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
महात्मा गांधीजींच्या स्मृतींना दिडशेव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांतून आदरांजली वाहण्यात येत आहे. सेवाग्राम आश्रम परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिडशेव्या जयंतीनिमित्त देशाच्या वेगवेगळ्या भागातून लोकं इथल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले आहे. जयंतीनिमित्त आश्रमात सकाळी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी रामधून काढण्यात आली. यावेळी सामूहिक श्रमदान करत स्वच्छता केली. यानंतर दिवसभराच्या अखंड सूतकताईला सुरुवात करण्यात आली.
आश्रम प्रतिष्ठानच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. सेवाग्राम आश्रम परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिडशेव्या जयंतीनिमित्त देशाच्या वेगवेगळ्या भागातून लोकं इथल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले आहेत. दिवसभर देशाच्या वेगवेगळ्या भागातून गांधी विचारांवर काम करणारे, प्रसार करणारे भेटी देणार आहेत.
150 व्या जयंतीनिमित्त देशभर 150 ठिकाणी एक दिवसाचा उपवास
महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त देशभरात 150 ठिकाणी एक दिवसाचा उपवास करणार आहे. लोकशाहीची रक्षा आणि अभिव्यक्ती स्वतंत्र हा उपवासाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी वर्धा येथे बोलताना दिली. गांधीजींच्या विचारांचं मुख्य अंग अहिंसा असून हा अहिंसेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, असंही महादेव विद्रोही यांनी सांगितलं.
पुणे रेल्वे स्टेशनचं सुशोभिकरण
महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त पुणे रेल्वे स्टेशनचं सुशोभिकरण करण्यात आलं. इंडिगो पेंट्सतर्फे हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. पुणे स्टेशनमधील इमारतीच्या भिंतींवर पुण्याच्या संस्कृतीची प्रतिकं चितारण्यात आलेली आहेत. इंडिगो पेंट्सच्या या उपक्रमाअंतर्गत एमआयटी स्कूल आॅफ फाईन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी ही चित्रं काढली आहेत. त्यामुळे आता पुणे रेल्वे स्टेशनच्या भिंती उठून दिसत आहेत. महात्मा गांधी यांनी सांगितलेला स्वच्छतेचा मंत्र आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि त्याचा आपण अवलंब करावा अशी भावना इंडिगो पेंट्सचे मॅनेजिंग डायरेक्टर हेमंत जलान यांनी यावेळी व्यक्त केली.
वर्सोवा बीचवर स्वच्छता मोहीम
महात्मा गांधी जयंतीनिमित्त वर्सोवा बीच स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत सीआरपीएफ जवानांसोबत मुंबईतील विविध संस्थांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तीन तास या विद्यार्थ्यांनी वर्सोवा बीच स्वच्छता मोहीम राबवली.
प्लास्टिक पीक अप डे कार्यक्रम
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीत आज प्लास्टिक पीक अप डे कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. या उपक्रमामध्ये या सर्व शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी देखील सहभाग घेतला.
गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात रॅली
सोलापुरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळ्यापासून रेल्वे स्टेशन परिसरातल्या महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली. यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमवेत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले. ज्या देशात टाचणी देखील तयार होत नव्हती तिथे चंद्रयान निर्मिती करण्याची ताकद गांधीजी यांच्यामुळे मिळाली असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं. तर देशभरात जाणीवपूर्वक गांधीजींचे विचार संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र काँग्रेस या सर्व प्रवृत्तीच्या विरोधात लढत असल्याचे वक्तव्य आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement