Pune News : श्रीरामांच्या नावाने आजही अनेक मानवी दगड तरंगत आहेत; स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा राजकीय नेत्यांना टोला
प्रभू श्रीराम यांच्या नावाने दगड तरंगतात यावर माझा पूर्ण विश्वास बसला आहे, कारण देशात आजही अनेक मानवी दगड प्रभू श्रीराम यांचे नाव घेऊन तरंगत आहेत, असं वक्तव्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केलं.
Pune News : प्रभू श्रीराम आणि राम मंदिर या विषयावर अनेक राजकीय (Ram mandir) पक्षांकडून बरीच वक्तव्ये केली जातात. अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर निर्माणचे श्रेय घेण्याचा प्रयत्नही विविध राजकीय पक्ष करताना पाहायला मिळत आहे. अशातच श्रीराम जन्मभूमी न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी या परिस्थितीबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. "प्रभू श्रीराम यांच्या नावाने दगड तरंगतात यावर माझा पूर्ण विश्वास बसला आहे, कारण देशात आजही अनेक मानवी दगड प्रभू श्रीराम यांचे नाव घेऊन तरंगत आहेत, असा टोला त्यांनी राजकीय नेत्यांना लगावला आहे.
आज पुण्यातील वेदिक कॉसमॉस या प्रकाशन संस्थेतर्फे अनोख्या ग्रंथ स्वरूपात तयार करण्यात आलेल्या वाल्मिकी रामायणाचे प्रकाशन स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, श्रीरामाद्वारे केलेला एकही चमत्कार वाल्मिकी रामायणात नाही आहे. दगडाची स्त्री झाली हे वाल्मिकी रामायणात नाही. रामाचं नाव लिहून समुद्रात फेकलेले दगड तरंगायला लागले यावर आताच्या काळात मी विश्वास ठेवू, शकतो कारण आजही अनेक मानवी दगड रामाच्या नावाने तरंगताना दिसत आहे, असं ते म्हणाले.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, सध्या सगळीकडेच राम मंदिराची चर्चा आहे. राम सर्वांचा आहे, कोणत्या एका पक्षाचा नाही. अनेक राजकीय नेते अयोध्येचा दौरा करत आहे. मध्यंतरीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी साकडं घातलं होतं. उद्धव ठाकरे यांनीदेखील काही वर्षांपूर्वी अयोध्येच दौरा करत राम रलल्लाचं दर्शन घेतलं होतं. राम मंदिरावर सगळेच नेते दावा करताना मागील काही दिवसांपासून दिसत आहे.
स्वामी गोविंददेव महाराज म्हणाले, " महर्षी वाल्मिकी हे रामायणाचे समकालीन लेखक आहेत. त्यामुळेच रामायणाचा अभ्यास करण्यासाठी वाल्मिकी रामायण हेच मूळ रामायण आहे. या ग्रंथामधील रामकथा ही देवाची नव्हे, तर एका मनुष्याची कथा आहे. गुणवान पुरुषाचे चित्र निर्माण करणे हे वाल्मिकी रामायणाची वृत्ती आहे. सर्व मानवी मर्यादाचे पालन करतानाही, कशाप्रकारे तुम्ही प्रेम, धर्म, कर्तव्य पालन करू शकता याचे योग्य उदाहरण दिले आहे. वाल्मिकी रामायण ही चमत्कारावर आधारित रामकथा नसून, विज्ञान, अध्यात्म, व्यवस्थापन अशा सर्वच विषयांचे ज्ञान देणारी ही कथा आहे. त्यामुळेच लोकांनी खासकरून तरुण पिढीने वाल्मिकी रामायण अवश्य वाचले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.