महारेरा नोंदणीक्रमांकाशिवाय जाहिरात; मुंबई-पुण्यासह 14 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस
Maharera : मुंबई लगतच्या भागातील 5 ,पुणे , नागपूर परिसरातील प्रत्येकी 3, नाशिक परिसरातील 2 आणि औरंगाबाद परिसरातील 1 विकासकांचा यात समावेश आहे.
Maharera : महारेराच्या नोंदणी क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती करणाऱ्या प्रकल्पांवर महारेराने स्वाधिकारे (Suo Motto) कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध वर्तमानपत्रांत महारेरा क्रमांकाशिवाय प्रसिद्ध होणाऱ्या अशा जाहिरातींची महारेराने स्वाधिकारे नोंद घेऊन 14 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीसेस बजावल्या आहेत. या सर्वांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या विहीत मुदतीत चुकांची दुरूस्ती करणे अपेक्षित असून उचित प्रतिसाद न देणाऱ्या विकासकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
याशिवाय महारेरा नोंदणीक्रमांक असूनही काही ठिकाणी नोंदणीक्रमांकाचा उल्लेख करायचे जात असल्याचेही महारेराच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकल्पांना याबाबत उचित काळजी घेण्याचे कळविण्यात आले आहे. नोंदणीक्रमांकाशिवाय जाहिरात करणाऱ्यात मुंबई लगतच्या भागातील 5 ,पुणे , नागपूर परिसरातील प्रत्येकी 3, नाशिक परिसरातील 2 आणि औरंगाबाद परिसरातील 1 विकासकांचा यात समावेश आहे. महारेराने अशा सर्व प्रकल्पांवर स्वाधिकारे ( Sue Motto) कारवाई सुरू केलेली आहे.
महारेरा नोंदणी क्रमांक असल्याशिवाय कुठल्याही विकासकाला प्रकल्पाची कुठल्याही प्रकारची जाहिरात, त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी, विक्री, खरेदी करता येत नाही. काही विकासक या नियमाकडे कानाडोळा करून महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय किंवा 'महारेरा नोंदणीकृत' असे फक्त लिहून सर्रास जाहिराती करीत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे .
स्थावर संपदा कायद्यानुसार 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त किंवा 8 सदनिकांचा कुठलाही प्रकल्प( यात प्लाॅटसचाही समावेश आहे) असल्यास त्याची महारेराकडे नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. याची नोंद आपली गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित राहावी यासाठी घर खरेदीदारांनी घेणे आवश्यक आहे. म्हणून घरखरेदीदार आणि स्थावर संपदा क्षेत्रातील तत्सम गुंतवणूकदारांनी महारेरा नोंदणीक्रमांक नसलेल्या प्रकल्पांत गुंतवणूक करण्याचे टाळावे ,असे आवाहन महारेराच्या वतीने करण्यात आले आहे.
घर खरेदीदार आणि एकूणच स्थावर संपदा क्षेत्रातील गुंतवणूक सुरक्षित राहावी , त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाने हा स्थावर संपदा अधिनियम लागू केला आणि या क्षेत्राचे व्यवस्थित विनियामन व्हावे यासाठी महारेराची स्थापना केली. महारेरा घर खरेदीदार आणि या क्षेत्रातील इतर गुंतवणूकदारांच्या वतीने अनेक मूलभूत बाबींची काळजी घेत असते.
म्हणून ग्राहकांनी प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे ना ? महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख दिलेली आहे ना ? घर खरेदीकरार महारेराने ठरवून दिलेल्या आदर्श घर खरेदी करारानुसारच आहे ना ? तुम्ही 10 टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घरखरेदी,घर नोंदणी करीत असल्यास विकासक घर विक्री करार करतोय ना ? आणि ज्यांच्यामार्फत हा व्यवहार करताय ते मध्यस्थ महारेरांकडे नोंदणीकृत आहेत ना ? या सर्व बाबींची खात्री करून घ्यायला हवी. तुमची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी हे आवश्यक आहे.
प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असेल तर विकासकांना रेरा कायद्यानुसार ग्राहक हिताच्यादृष्टीने अनेक अटींची पूर्तता करावी लागते. यात त्या प्रकल्पातील गुंतवणूकीपोटी आलेला पैसा स्वतंत्र खात्यात ठेवून प्रकल्पाचे काम प्रमाणित करूनच पैसे काढता येतात . शिवाय विकासकाला दर तीन महिन्याला प्रकल्पस्थितीची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर अध्ययावत करणे बंधनकारक आहे. यात प्रकल्पात काय काम चालू आहे, कसे काम चालू आहे, काम कुठपर्यंत आलेय या बाबी घरखरेदीदारांना घरबसल्या महारेराच्या संकेतस्थळावर पाहता येतात.
याशिवाय या सर्व प्रक्रियेत विकासकासोबत होणारा घर खरेदीकरार हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज असतो. याबाबतही महारेराने आदर्श खरेदीकरार जाहीर केलेला आहे. त्यात दैवी आपत्ती , चटई क्षेत्र दोष दायित्व कालावधी आणि प्रकल्प हस्तांतरण करार या बाबी महारेरा कायद्यानुसार आवश्यक असून त्यात विकासकाला कुठलाही बदल करता येत नाही. याशिवाय आदर्श खरेदी करारात खरेदीदाराच्या संमतीने काही बदल करायचे असल्यास विकासक ते करू शकतात. परंतु खरेदीदाराला ते स्पष्टपणे कळावे यासाठी ते बदल अधोरेखित ( Underline) करणे बंधनकारक केलेले आहे.