महाराष्ट्र सरकारकडून जिल्ह्यांची झोन निहाय यादी जाहीर; फक्त 6 जिल्हे ग्रीन झोनमध्ये
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील जिल्ह्यांची झोन नुसार यादी जाहीर केली होती. आज राज्य सरकारनेही झोन निहाय यादी जाहीर केली. यात 14 जिल्हे रेड झोनमध्ये, 16 ऑरेंज तर 6 ग्रीन झोनमध्ये गेले आहेत.
मुंबई : राज्य सरकारने आज कोरोना रुग्णांच्या जिल्ह्यातील परिस्थितीनुसार झोन जाहीर केले आहेत. त्यानुसार राज्यात 14 जिल्हे रेड झोनमध्ये, 16 ऑरेंज तर 6 ग्रीन झोनमध्ये गेले आहेत. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली होती. त्यावर राज्य सरकारने देखील आज झोन विषयी माहिती दिली आहे. यामध्ये कोणताही नवीन बदल नाही. त्यामुळे राज्याने केंद्राच्याच यादीवर शिक्कामोर्तब केलं असल्याचे दिसते. या जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे नियोजन ठरवण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, रेड झोनमध्ये कुठल्याही प्रकारची शिथिलता देणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारपासून देशभरात अडकलेल्या लोकांना स्वगृही पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक विशेष ही रेल्वे सेवा सुरू केली आहे.
राज्यात रेड झोनमध्ये 14 जिल्हे आहेत. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, सातारा, पालघर, पुणे, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नाशिक, अकोला, यवतमाळ यांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. ऑरेंज झोनमध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, रायगड, अहमदनगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, परभणी, नंदूरबार हे जिल्हे आहेत. तर कमी कोरोना रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. राज्यात 6 असे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, गोंदिया, वाशिम, वर्धा, गडचिरोली हे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये सात चिमुरड्यांची कोरोना विषाणूवर मात; सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह
रेड झोन मध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही : मुख्यमंत्री कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. टाळेबंदीसंदर्भात 3 मे नंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून करावा लागणार आहे. रेड झोनमध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही, रेड झोन मधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील. परंतु, ऑरेंज झोनमध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसेच ग्रीन झोन मधील निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथील करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मिशन कोटानंतर आता मिशन यूपीएससी, खासदार सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाठपुरावा सुरू
झोनचे निकष बदलल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले आहेत. आता 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही तर असा जिल्हा ऑरेंज झोन तर 28 दिवस नव्याने एकही रुग्ण आढळलेला नाही असा जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती. तर ज्या जिल्ह्यात 15 हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन असेल. कोरोना व्हायरसच्या प्रभावानुसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याआधी रुग्ण संख्या हा प्रमुख निकष होता. त्यानुसार 15 पेक्षा कमी रुग्ण म्हणजे ऑरेंज झोन आणि रुग्ण नाही म्हणजे ग्रीन झोन असे निकष होते. परंतु आता किती दिवसात रुग्ण आढळले हा झोन ठरवण्याचा निकष असेल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.
Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट