Maharashtra Rain: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आजचा दिवसही पावसाचाच, मुंबईतही मुसळधार; कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Mumbai Rain Updates: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आजचा दिवसही पावसाचाच राहणार असून मुंबईसह उपनगरांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Maharashtra Rain Updates : मुंबई : मान्सूननं (Monsoon Updates) संपूर्ण देश व्यापला असून देशातील विविध राज्यांमध्ये काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक भागांत वरुणराजाच्या कोसळणाऱ्या सरींनी अल्हाददायी वातावरण निर्माण झालं आहे. अशातच महाराष्ट्रातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कुठे रिमझिम, तर कुठे मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. अशातच हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण (Konkan Rain Updates) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) आजचा दिवसही पावसाचाच राहणार आहे. रत्नागिरी (Ratnagiri Rain) आणि रायगड (Raigad Rain) जिल्ह्याला आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयं आज बंद ठेवण्यात आली आहेत. कोकणात मुसळधार पाऊस झाला. अनेक नद्यांना पूर आला आहे, काही ठिकाणी रस्ते ठप्प देखील झाले आहेत. त्याचप्रमाणे, आज मुंबईतही (Mumbai Rain Updates) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आज कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
आज रत्नागिरीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दिवसभरत रत्नागिरीसह आसपासच्या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय काही भागांत मध्यम तर, काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
- रत्नागिरी, रायगड : रेड अलर्ट
- सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा : ऑरेंज अलर्ट
- मुंबई, ठाणे, पालघर : यलो अलर्ट
मुंबईसह उपनगरांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या वतीनं मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 48 तासांसाठी हवामान विभागानं शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत कमाल आणि किमान तापमान 30 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे. रविवारी सकाळपर्यंत मुंबईत 862 मिमी पावसाची नोंद झाली आहे असून मुंबईत जुलै महिन्याच्या सरासरी 855.7 मिमी पाऊस पडला आहे. तर जून पासून आत्तापर्यंत मुंबईत 1209 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईत पाणीसाठ्यात वाढ, पाणीकपात मात्र कायम
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 68 हजार दशलक्ष लिटरची भर पडली आहे. धरणांतील पाणीसाठा 29.73 टक्क्यांवर आला असून 24 तासांत 18 दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली असून धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावाच लागणार आहे.
अमरावतीत ढगफुटी सदृश्य पाऊस
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नालवाडा शहरांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे. पावसामुळे हजारो हेक्टर शेतातील पिकाचे नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराज्याच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच, ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलं आहे.