Maharashtra Weather : राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, तर दुसरीकडं तापमानाचा पारा वाढणार; वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Weather : एकीकडे राज्यातील तापमानात (Temperature) दिवसेंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे मात्र राज्याला अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) तडाखा बसण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडं तापमानात देखील दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील दोन दिवस विदर्भाच्या (Vidarbha) तापमानात अधिक वाढ होण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
अवकाळी पावसाचा राज्यातील शेती पिकांना मोठा फटका
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकं बाधित झाली आहेत. द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या बागांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडं गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला या पिकांचेही नुकसान झालं आहे.
शेतकरी चिंतेत
सध्या राज्यातील नागरिकांना सकाळी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे. त्यामुळं आधीच संकटात सापडलेला बळीराजा पावसासह तापमान वाढीच्या इशाऱ्यामुळं चिंताग्रस्त झाला आहे.
पुढील दोन दिवस विदर्भाच्या तापमानात वाढ होणार
नागपूर वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजनुसार पुढील दोन दिवस विदर्भाच्या तापमानात वाढ होणार आहे. नागपूर शहराचं तापमान 40 अंशावर जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला नागपूर वेध शाळेनं दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: