Maharashtra weather update:महाराष्ट्र कुडकुडणार! ईशान्येकडून गार वाऱ्यांचे प्रवाह, पुढील 2 दिवसात कुठवर जाणार तापमान?
गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा हा गारवा मुख्यतः वाऱ्यांच्या दिशेमुळे निर्माण झाला असून, त्यामुळे सकाळ-रात्री कडाक्याची थंडी आणि दुपारी तुलनेने उष्णता असं मिश्र स्वरूप आहे.

Maharashtra weather update: नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागलाय . हवेत चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात बदल होतायत. राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांपासून मराठवाड्यापर्यंत पुढील काही दिवसांत तापमानात लक्षणीय घसरण होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ईशान्येकडून सतत येणाऱ्या गार हवेमुळे बहुतेक भागात थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईतही पुढील दोन-तीन दिवसांत तापमानात घट जाणवेल असं वर्तवण्यात आलं आहे. (Temperature Drop)
Weather Update: तापमान घसरण्याची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जळगावात गेल्या 4 दिवसांपासून हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. किमान तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअसवर नोंदवले जात आहे. परिसरात शनिवारपासून थंडी वाढेल आणि हा प्रवाह सोमवारपर्यंत कायम राहू शकतो असा अंदाज आहे. नाशिक, धुळे तसेच नंदुरबार येथे रविवारीसह सोमवारी अधिक गारवा वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील या बदलाचा प्रभाव किनारपट्टीच्या वरच्या भागातही होणार असून, 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान तापमान सुमारे 17 अंशांपर्यंत घसरू शकेल.
शनिवारी जळगावमध्ये राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान नोंदले गेले. सामान्य तापमानाच्या बरेच खाली होते. नाशिकमध्येही सकाळचा पारा दहाच्या आसपास स्थिरावला. वाऱ्यांची दिशा बदलल्याने कोकण किनाऱ्यावरही गारवा वाढताना दिसला; डहाणू येथे सकाळच्या तापमानात ठळक घट दिसून आली. मुंबईत सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही भागांत साधारणपणे नेहमीपेक्षा कमी किमान तापमान नोंदवले गेले. काही जिल्ह्यांमध्ये वेगाने तापमान घसरत आहे. गेल्या 24 तासात काही जिल्ह्यांमध्ये 5 ते 6 अंशांनी तापमान घसरले.
कोकण व गोवा
दहाणू – 17.8°C
गोवा (पणजी) – 20.8°C
हरनई – 21.6°C
मुंबई (कुलाबा) – 22.6°C
मुंबई (सांताक्रूझ) – 18.0°C
रत्नागिरी – 19.7°C
मध्य महाराष्ट्र
अहिल्यानगर – 9.5°C
जळगाव – 8.7°C
जेऊर – 9.0°C
कोल्हापूर – 15.8°C
महाबळेश्वर – 12.0°C
नाशिक – 10.3°C
पुणे – 11.2°C
सांगली – 14.2°C
सातारा – 12.0°C
सोलापूर – 15.4°C
मराठवाडा
छ. संभाजीनगर – 12.6°C
नांदेड – 11.3°C
धाराशिव – 13.3°C
परभणी – 11.7°C
विदर्भ
अकोला – 13.0°C
अमरावती – 12.7°C
ब्रह्मपुरी – 14.3°C
बुलढाणा – 13.4°C
चंद्रपूर – 13.6°C
नागपूर – 12.0°C
वर्धा – 12.9°C
यवतमाळ – 10.8°C
दिवसाच्या उष्णतेत मात्र फरक नाही
दिवसा मात्र ईशान्येकडील थंड प्रवाहाचा परिणाम अजून प्रकर्षाने दिसत नसल्याने अनेक भागांत तापमान नेहमीसारखेच राहिले. रत्नागिरीत दुपारी उष्णतेचा पारा 34 अंशांच्या पुढे गेला. मुंबईतही दुपारच्या वेळी 33 अंशांच्या आसपास तापमान नोंदले गेले. जळगावात सकाळ थंड असूनही दुपारी तापमान 30 अंशांवर पोहोचले. सध्या तरी दिवसाच्या तापमानात मोठ्या चढ-उतारांची शक्यता नाही. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा हा गारवा मुख्यतः वाऱ्यांच्या दिशेमुळे निर्माण झाला असून, त्यामुळे सकाळ-रात्री कडाक्याची थंडी आणि दुपारी तुलनेने उष्णता असं मिश्र स्वरूप देशाच्या या भागात काही काळ कायम राहण्याचा अंदाज आहे.
























