Weather Update : महाराष्ट्रासह उत्तर भारत गारठला, हरियाणाच्या नारनौलमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद
सध्या उत्तर भारतातसह (North India) महाराष्ट्रात (Maharashtra) थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडत आहे.
Weather Update : सध्या देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी थंडीचा (Cold Weather) कडाका तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. सध्या उत्तर भारतासह (North India) महाराष्ट्रात (Maharashtra) थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडत आहे. वाढत्या थंडीमुळं शेकोट्या पेटल्या आहेत. गेल्या तीन ते चार दिवसापासून महाराष्ट्रातील मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतही हुडहुडी वाढली आहे.
महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. रात्री कधी थंडीचा कडाका तर दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. हळूहळू राज्यात थंडीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 11 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरला आहे. मुंबईसह कोल्हापूर आणि पुण्यातही तापमानात वेगानं घट होत आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्येही थंडीत चांगलीच वाढ झाली आहे.
निफाडमध्ये तर पारा सात अंशांच्याही खाली
नाशिक जिल्ह्याच्या किमान तापमानात चांगलीच घट झाली असून निफाडमध्ये तर पारा सात अंशांच्याही खाली आला आहे. मात्र, या कडाक्याच्या थंडीतही बळीराजाला रात्रीचा दिवस करावा लागत आहे. याला कारण ठरतंय ते म्हणजे दिवसा होणारे भारनियमन. पालघर जिल्ह्याच्या विविध भागातही तापमानाचा पारा घसरला असून जव्हार भागात 11 अंश सेल्सिअस तापमान तर पालघर भागात 18 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्याच्या विविध भागात धूक्याची चादर पसरली असून पहाटे दाट धुकं पाहायला मिळत आहे.
उत्तर भारत गारठला
उत्तर भारतात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. देशाची राजधानी दिल्लीतही थंडीत वाढ झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासात उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक वाढणार आहे. तसेच उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच पूर्व राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्येही दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
हरियाणाच्या नारनौलमध्ये 2.4 अंश सेल्सिअस तापमान
पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागात कडाक्याची थंडी आणि दाट धुके आहे. हरियाणा राज्यातील नारनौल याठिकाणी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. नारनौल इथे 2.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हरियाणातील हिसार इथे 2.5 अंश सेल्सिअस, अंबाला इथे 7.7 अंश सेल्सिअस, कर्नाल 6.8 अंश सेल्सिअस, रोहतक 6.6 अंश सेल्सिअस, भिवानी 5.5 अंश सेल्सिअस आणि सिरसा येथे 5.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. यासह, चंदीगडमध्ये किमान तापमान 7.4 अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली आहे.
वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा
राज्यात वाढलेली थंडी ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. रब्बी पिकांसाठी ही थंडी चांगली आहे. थंडीचं प्रमाण वाढल्यानं त्यामुळं गहू, मका आणि इतर पिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यानं राज्यातील खरीप पीक वाया गेली आहेत. त्यामुळं आता शेतकऱ्यांना रब्बी पिकातून अपेक्षा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: