Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकटही कायम आहे. पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
मुंबई : महाराष्ट्रावर (Maharashtra) एकीकडे अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट कायम आहे, तर दुसरीकडे मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), कोकणात (Kokan Region) उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांसाठी हवामान विभागाने (IMD) कोकणात तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवस मुंबई, ठाणेसह कोकणासाठी हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली असून उष्णतेचा यलो अलर्टही जारी केला आहे. त्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकटही कायम आहे. पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात येत आहे.
कुठे ऊन, कुठे पाऊस
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत पावासाची शक्यता आहे. काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 25, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/MtM4iLJpOI
मुंबईसह या भागात उष्णतेची लाट
हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 48 तासात राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. आयएमडीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रात या भागावर अवकाळी पावसाचे ढग कायम
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सोलापूर, धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात पावसाची शक्यता आहे. 27 एप्रिलला जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 26 आणि 27 एप्रिलला धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो.
हवामान खात्याचा अंदाज काय सांगतो?
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या तडाखा बसताना दिसत आहेत. मात्र, देशाच्या काही भागात अवताळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण आल्हाददायक आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :