Weather : कुठं ढगाळ तर कुठं उन्हाचा चटका, पुढील पाच दिवस राज्यातील हवामानाचा अंदाज काय?
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुठे उन्हाचा चटका आहे. तर काही भागात सध्या थंडीचा कडाका वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुठे उन्हाचा चटका आहे. तर काही भागात सध्या थंडीचा कडाका वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
'या' जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवारी 9 पर्यंत ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक आहे. अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे. तर विदर्भ मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रात मात्र पहाटेचा गारवा कमी होवून दुपारचे कमाल तापमान काहीसे अधिक राहण्याची शक्यता आहे. तिथे पावसाची शक्यता नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार
पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून कमी दाब क्षेत्राची निर्मिती होऊ शकते. परंतू, त्यापासून महाराष्ट्रात साधारण 20 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही पावसाची शक्यता जाणवत नाही. तर शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबरपासून पुन्हा हळूहळू पहाटेच्या गारव्यात वाढ होवून दुपारचे कमाल तापमानही सामान्य राहण्याची शक्यता जाणवत आहे.
राज्यातील तापमानात बदल
गेल्या काही दिवसांत मुंबई, कोकणसह राज्यातील तापमानात बदल झाला आहे. सकाळी हवेतील गारवा वाढला आहे. यामुळे ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पण, आता नोव्हेंबर उजाडताच तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवलीसह पनवेल आणि पालघरमध्येही पहाटे गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मंगळवारी नोव्हेंबर महिन्याचा हवामानाचा अंदाज जाहीर केला. आयएमडीने जारी केलेल्या नोव्हेंबर महिन्यात कमाल आणि किमान तापमानात घट होणार आहे, पण थंडी कमी राहणार आहे. त्यासोबतच हवामान विभागाने पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.