(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज राज्यात कसं असेल हवामान? 14 जूनपर्यंत 'या' 14 जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज
हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी पावसाबाबतचा अंदाज वर्तवला आहे. आज राज्यातील 14 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.
Maharashtra Weather News : राज्यातील बहुंताश जिल्ह्यात पावसाला (Rain) सुरुवात झालीय. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी पावसाबाबतचा अंदाज वर्तवला आहे. आज राज्यातील 14 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
14 जूनपर्यंत या भागात मुसळधार पावसाची शक्यता
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात 14 जून पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. परंतू, या कालावधीत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. म्हणजेच राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये चांगला पाऊस पडणार अशी शक्यता पंजाबराव डखांनी व्यक्त केली आहे. उर्वरित राज्यात मात्र खूप मोठा पाऊस पडणार नाही. तसेच 15 ते 16 जून दरम्यान पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते.
राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस
राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. एप्रिल आणि मे महिन्यात दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. सोलापूर, धाराशीव, रायगड, रत्नागिरी, जालना, परभणी, लातूर, बुलढाणा या जिल्ह्यात दोन ते तीन दिलापासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तुफान बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी, बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बंधारांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर जमिनीत पावसाला पुन्हा सुरुवात होताच खरीप पिकाच्या पेरणीला वेग येणार आहे.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लवकरच राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. जून महिन्यात मान्सून जरी महाराष्ट्रात दाखल झाला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस राज्यात पडत नाही. सर्रास जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्यातच राज्यात चांगला पाऊस होत असतो. यावेळी मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नदी नाले भरुन वाहत आहेत. दुसरीकडे धरणांमधील पाण्याची पातळी हळूहळू वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतीकामाला आता वेग येणार आहे.
महत्वाच्या बातम्या: