उद्यापासून महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार, तापमानाचा पारा 12 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता
18 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात (Maharashtra) थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान अभ्यास ऋषिकेश आग्रे यांनी दिली. त्यामुळं पुढचा आठवडा हा थंड आठवडा असणार आहे.
Maharashtra Weather : 18 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात (Maharashtra) थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान अभ्यास ऋषिकेश आग्रे यांनी दिली. त्यामुळं पुढचा आठवडा हा थंड आठवडा असणार आहे. मुंबईसाठी (Mumbai) देखील पुढचा आठवडा हा जोरदार थंडीचा आहे. पुढील आठवड्यात तापमान 18 अंश सेल्सिअसच्या खाली जाणार आहे. ठाण्यात 16 ते 17 अंश सेल्सिअस, पुण्यात 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याची माहिती आग्रे यांनी दिली.
पुढील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात उत्तरेकडील वारे सक्रिय होत असल्याने या हिवाळ्याच्या हंगामातील थंड हवामान अधिक थंड होईल असे हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 20 ते 21 अंशाच्या आसपास गेला आहे. त्यामुळं त्या भागात थंडी वाढली आहे. हळूहळू या भागात थंडीचा जोर वाढत जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
थंडी वाढली, शेकोट्या पेटल्या
महाराष्ट्रातील काही भागात हळूहळू थंडीचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात लोक शेकोट्या पेटवत आहेत. यावेळी राज्यात पावसाळ्याचं हंगाम लांबला होता. त्यामुळं थंडीचा हंगामा काहीसा उशीरा सुरु झाल्याचं चित्र दिसत आहे. काही भागात हळूहळू थंडी वाढत आहे. अनेक भागात तापमानाचा पारा 20 अंशाच्या खाली आला आहे. 25 नोव्हेंबरपर्यन्त चक्रीवादळाच्या बीजरोवणीसाठीची कोणतीही वातावरणीय निर्मितीही दोन्हीही समुद्रात सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातही थंडीसाठी अटकाव करणारा कोणताही वातावरणीय परिणाम जाणवणार नाही. त्यामुळं थंडीचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाळ्याचे दिवस संपले, थंडीचा कडाका सुरु
यावर्षी राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस सुरु झाला होता. राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, पावसाळ्याचे दिवस संपले तरीदेखील अनेक भागात पावसानं जोराचा दणका दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं होते. याचा मोठा फटका देखील शेती पिकांना बसला होती. शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली होती. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील सर्वच भागाच कोरडे हवामान आहे. आता हळूहळू थंडीचा जोर चांगलाच वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: