सावधान! थंडीची लाट येणार! कुठं कुठं गारठा वाढणार? पुढील सहा दिवस कसं असेल हवामान?
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या थंडीमुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या थंडीमुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उद्या काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सध्या थंडीची लाट कुठे कुठे आहे. तसेच पुढील सहा दिवस राज्यातील वातावरण कसं राहणार याबाबतची सविस्तर माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
थंडीचे दिवस
सध्या महाराष्ट्रात जाणवत असलेली थंडी, आजपासुन पुढील सहा दिवस म्हणजे शुक्रवार 21 नोव्हेंबर (मार्गशीर्ष प्रतिपदा) पर्यंत अशीच जाणवणार असुन पुढील 3 दिवस परवा मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर पर्यन्त थंडीत काहीशी वाढ होण्याची शक्यता जाणवते. शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर पासुन सध्यापेक्षा थंडी केवळ काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते.
जेऊरला पुन्हा थंडीची लाट
करमाळा तालुक्यातील जेऊरलाला आज पहाटे पाच वाजता 9 अंश से. इतके किमान तापमान नोंदवले आहे. सरासरीपेक्षा 5.5 इतक्या अंश से. ने ते खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची लाट जाणवत आहे.
थंडीचे सातत्य टिकून
महाराष्ट्रातील डहाणू जळगांव नंदुरबार नाशिक मालेगाव अहिल्यानगर पुणे सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, नांदेड, परभणी ह्या शहरात व संपूर्ण विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात पहाटेच्या 5 च्या किमान तापमानाचा पारा सरासरीच्या 4 ते 5 डिग्रीने खालावून तेथे आजही चांगलीच थंडी जाणवली असुन थंडीचे सातत्य टिकून आहे.
दिवसाही जाणवतोय गारवा
मालेगांव( जि. नाशिक ) जळगांव बीड नांदेड वाशिम येथे दुपारी 3 चे कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 डिग्रीच्या आसपास खालवले असल्यामुळे तेथे व लगतच्या परिसरात रात्री बरोबर दिवसाही काहीसा गारवा जाणवत आहे.
शेती पिकांना थंडीचा फायदा
गेल्या 8 ते 10 दिवसापासून म्हणजे 8 नोव्हेंबर पासून जाणवत असलेल्या माफक थंडीमुळे महाराष्ट्रातील सध्याचे बाल्यावस्थेतील रब्बीची शेतपिके, फळ-बागा व इतर भाजीपाला पिकांना मदतच होवु शकते. त्यामुळं सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेतील ह्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी ही जमेचीच बाजू समजावी, असे वाटते.
उद्या काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उद्या काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा गारठणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दोन्ही भागांत किमान सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, आणि नाशिकातील काही भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेडात देखील तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.























