Maharashtra Weather Update: पुणे, नाशिक, नंदुरबार, जळगावकरांनो सावधान! येत्या 48 तासात IMD चा तीव्र इशारा, हवामानतज्ञ होसाळीकरांची पोस्ट
येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान 3 ते 4 अंशाने वाढणार आहे .विदर्भात कमाल तापमानाचा पारा पुढील पाच दिवसात 4 ते 6 अंशांनी वाढणार आहे .

Maharashtra weather update: राज्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे इशारे देण्यात आले होते .त्यानुसार राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .दरम्यान राज्यभरात अवकाळी पावसाचे ढग विरळ झाले असले तरी मध्य महाराष्ट्र आणि दक्षिणेकडे काही भागांना अजून पावसाचे इशारे कायम आहेत .मात्र आता राज्यात प्रचंड तापमान वाढणार असल्याचा अंदाज आहे . उत्तर महाराष्ट्र व भारतातील वायव्य भागात तापमान ही प्रचंड वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे . हवामान विभागाचे पुढे येथील प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी याविषयीची एक x माध्यमावर पोस्ट केली आहे . (IMD forecast)
त्यानुसार पुढील 48 ते 72 तासात उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 40° च्या पुढे पोहोचू शकतो .वायव्य भागातील अतिरेकी तापमानावर लक्ष ठेवा आणि काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी केले आहे .नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे आणि नाशिकसह आजूबाजूच्या भागातील लोकांनी सावधपणे वागावं असंही त्यांनी म्हटलंय .
5 April, आयएमडी मॉडेल मार्गदर्शनानुसार, पुढील ४८ ते ७२ तासांत उत्तर महाराष्ट्रातील काही भाग कमाल तापमान ४०+ पर्यंत पोहोचू शकतात. वायव्य भागातील अतिरेकी तापमानावर लक्ष ठेवा आणि काळजी घ्या. नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे नाशिक आणि आसपासच्या लोकांनी कृपया लक्ष ठेवा. pic.twitter.com/xP4IiKORL1
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 5, 2025
कोकणात उष्ण लहरी
पूर्वेकडून आलेल्या वाऱ्यामुळे कोकणात येत्या काही दिवसात प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाची नोंद होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं .गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या हवामान विभागाच्या अहवालात एप्रिल ते जूनपर्यंत उष्णतेच्या लाटा आणि प्रचंड तापमान राहण्याची शक्यता होती .आता तापमान वाढण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे .रत्नागिरी, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे . सिंधुदुर्गाच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यताही आहे .मात्र प्रचंड उष्ण आणि दमट वारे कोकणात वाहत आहेत .
पावसाचा अंदाज कुठे कुठे ?
गेल्या चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला होता .राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे .मात्र आता अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे इशारे विरळ झाले आहेत .आज (5 एप्रिल ) लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे . पुण्यातील काही भागात तसेच सातारा आणि सिंधुदुर्ग, अहिल्यानगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे .तर कोकणात आजपासून उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट आहे . उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा कोणताही इशारा नसून आता तापमान वाढण्यास सुरुवात होणार आहे .प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या हवामान अंदाजानुसार येत्या 24 तासात राज्यातील कमाल तापमानात फारसा बदल नसला तरी येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान 3 ते 4 अंशाने वाढणार आहे .विदर्भात कमाल तापमानाचा पारा पुढील पाच दिवसात 4 ते 6 अंशांनी वाढणार आहे .
हेही वाचा:
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 10 AM 05 April 2025
























