राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती, धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक; तब्बल 940 टँकरने पाणीपुरवठा
Maharashtra Water Storage : राज्यात आता फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे सध्या मार्च महिना सुरु असून, पावसाळा सुरु होण्यासाठी अजून एप्रिल आणि मे महिना शिल्लक आहे.
Maharashtra Water Storage : महाराष्ट्रातील जलसाठ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत असून, राज्यातील धरणांमधील (Dam) जलसाठ्याची (Water Storage) भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण राज्यातील धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याचवेळी राज्यातील धरणांमध्ये 54 टक्के पाणीसाठा होता. तसेच मराठवाड्यात (Marathwada) देखील चिंताजनक परिस्थिती असून, मराठवाड्यातील धरणांमधील पाणीसाठा अत्यल्प आहे. ज्यात मराठवाड्यात फक्त 21 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाई निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला गेला होता. दरम्यान, त्याची चाहूल आता जाणवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण राज्यात आता फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे सध्या मार्च महिना सुरु असून, पावसाळा सुरु होण्यासाठी अजून एप्रिल आणि मे महिना शिल्लक आहे. त्यामुळे एप्रिलनंतर आणि मे महिन्यात राज्यात पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
राज्यातील पाण्याची परिस्थिती काय?
- राज्यातील धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
- मागील वर्षी याचवेळी राज्यातील धरणांमध्ये 54 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
- मराठवाड्यातील धरणांमधील पाणीसाठा अत्यल्प, म्हणजेच फक्त 21 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
- नाशिक आणि पुणे विभागातील धरणक्षेत्रात 40.5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
- कोकणतील परिस्थिती या तुलनेनं चांगली असून, कोकणातील धरणांमध्ये 53 टक्के जलसाठा शिल्लक आहे.
- अमरावतीत 52 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
- नागपुरात 50 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे.
- जायकवाडी धरणात जलसाठा 23 टक्क्यांपर्यंत खाली उतरला आहे.
- बीडमधल्या मांजरा धरणात फक्त 8.43 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
- दुसरीकडे माजलगाव धरण शून्य टक्क्यांवर आहे.
- उस्मानाबादेतील अनेक छोटी धरणं शून्य टक्क्यांवर आहे.
- उजनी धरणसाठा देखील शून्य टक्क्यांवर, मागील वर्षी याचवेळी या धरणात 55 टक्के पाणीसाठा होता.
- कोयना धरणाचा जलसाठा देखील निम्म्यावर असून, 51 टक्के जलसाठा शिल्लक आहे.मागील वर्षी याचवेळी 83 टक्के पाणीसाठा होता.
राज्यात 940 टँकरने पाणीपुरवठा....
राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने, टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यातील 859 गावात आणि 2054 वाद्यांवर तब्बल 940 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 65 शासकीय आणि 875 खाजगी टँकरचा समावेश आहे. ज्यात सर्वाधिक पाण्याचे टँकरने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरु आहे. एकूण टँकरची संख्या पाहिल्यास पालघर जिल्ह्यात 13 टँकर, नाशिक 189 टँकर, धुळे 4 टँकर, जळगांव 29 टँकर, अहमदनगर 49 टँकर, पुणे 49 टँकर, सातारा 116, सांगली 72 टँकर, सोलापूर 21 टँकर, संभाजीनगर 200 टँकर, जालना 176 टँकर, बीड 2 टँकर, लातूर 3 टँकर, बुलढाणा 17 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :