Wardha : वर्ध्यातील प्रेरीकांच्या अग्निपरीक्षा आंदोलनाला नागपुरात यश
जिल्हा प्रशासन व राज्य सरकारला निवेदनाद्वारे आणि वर्धा येथे 14 मार्चला 400 ते 500 प्रेरिका महिलांनी एक दिवसीय उपोषण करून जिल्हाधिकारी वर्धाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला निवेदन देऊन न्यायाची मागणी केली होती.
वर्धा : सरकार मागण्या मान्य करते का हे बघण्यासाठी वर्ध्यातील युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रेरीकांनी नागपुरात अग्निपरीक्षा आंदोलन केले. चार दिवसांनी त्याला यश मिळाले.
महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रेरिका कार्यरत आहे. या प्रेरिका रात्रंदिवस या अभियानासाठी काम करत आहे. ग्रामीण भागात जाऊन बचतगट बनवणे व त्या भागातल्या महिलांना बचतगटच्या फायद्याबाबत जागृत करणे तसेच ग्रामीण भागात गरीबी निर्मूलन करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या प्रेरिका महिलांना मानधनाच्या नावावर 3 हजार रुपये मिळतात आणि हे महिनेवारी मानधनही 10 ते 12 महीने पेंडिंग राहते व त्या एकसाथ मिळणाऱ्या मानधनामधून सुद्धा काही रुपये कपात केले जातात. अशा प्रकारचा अन्याय या महिलांवर होत असल्याने वर्धा प्रशासनाला याची माहिती देण्यात आली होती.
जिल्हा प्रशासन व राज्य सरकारला निवेदनाद्वारे आणि वर्धा येथे 14 मार्चला 400 ते 500 प्रेरिका महिलांनी एक दिवसीय उपोषण करून जिल्हाधिकारी वर्धाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला निवेदन देऊन न्यायाची मागणी केली होती. प्रेरिकाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून मागील 10 ते 12 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आली. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाकडून प्रश्न सुटत नसल्यामुळे अखेर सर्व प्रेरिका व केडर सोबत दिनांक 30 मार्चपासून बेमूदत अग्निपरीक्षा आंदोलन संविधान चौक नागपुर येथे पुकारले. अखेर या आंदोलनाला चार दिवसांनी यश आले. महिलांच्या काही मागण्या मान्य झाल्या ज्यात महिलांना ओळखपत्र देण्याची मागणी आणि डिसेंबर 2021 पर्यंतचे थकीत मानधन देण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांकडून मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी दिलासा व्यक्त केला.
आंदोलनाचे नेतृत्वकर्ते निहाल पांडे यांची प्रतिक्रिया :
सामान्य नागरिकांवर अग्निपरीक्षा आंदोलनाची वेळच येऊ देऊ नका. एकीकडे आमदारांना घर देण्यासाठी पैसे आहेत मात्र गोरगरिबांच्या कामाचे मानधन थकीत आहे, हे निषेधार्थ आहे अशा प्रतिक्रिया युवा परीवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांनी दिल्या असून इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत लढा देऊ अशाही प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त झाल्या.
काय आहेत आंदोलनकर्त्या महिलांच्या मागण्या :
- 10 ते 12 महिन्याचा थकित मानधन तत्काळ सरसकट देण्यात यावे
- प्रेरिकाच्या मानधनामध्ये वाढ करुन 10 हजार मानधन देण्यात यावे
- मानधन थेट शासनाकडून प्रेरिकाच्या खात्यात जमा करण्यात यावे
- प्रेरिकेला ड्रेसकोड व ओळखपत्र देण्यात यावे
- प्रेरिकेला अभियानाच्या कामानिमित्त आरोग्य विमाचा लाभ द्यावा व त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी शासनाने घ्यावी.
- या अभियानात काम करत असलेल्या सर्व प्रेरिका व कॅडरला महिन्यातून 4 रजा अभियानातर्फे देण्यात यावे.
- MIP करीत असतांना त्याचे वेगळे मानधन द्यावे.
सर्व कॅडरचे मानधन 5000 करण्यात यावे व सरळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे
सोबतच आय कार्ड, ड्रेस कोड व आरोग्य विमा सुद्धा देण्यात यावा.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha