विधानसभेची खडाजंगी : पुण्यात भाजप आपला दबदबा राखणार की दादांचं वर्चस्व राहणार? कुणाचं राहणार पारडं जड, जाणून घ्या आमदारांची यादी अन् सध्याची राजकीय स्थिती
Pune Vidhan Sabha Election 2024 : पुण्यातला राजकीय वारसा देखील खूप मोठा आहे. पुण्यातील नेते हे खासदारांपासून ते केंद्रिय मंत्री पदापर्यंत आपल्याला दिसतात. अशाच या पुण्यात लोकसभेनंतर आता हळूहळू विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत.
Pune Vidhan Sabha Election 2024 : पुणे शहर आणि जिल्हा जसा वेगवेगळ्या लढाई अन् शैक्षणिक घडामोडींचा साक्षीदार आहे तसाच राज्यातल्या राजकारणातल्या महत्वाच्या राजकीय घडामोडींचा देखील साक्षीदार आहे. राजधानी मुंबई अन् उपराजधानी जरी नागपूर असली तर अर्ध्या अधिक राजकीय घडामोडी पुण्यात पाहायला मिळातात किंवा घडतात देखील. पुणे जिल्ह्यातील राजकारण्याने दिल्ली गाठली अन् थेल गल्लीतला नेता दिल्ली गाजवू शकतो हे दाखवून दिलं. शरद पवार, सुप्रिया सुळे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेकांनी पुण्याच्या (Pune Vidhan Sabha Election 2024) राजकारणाला वेगळं वलय प्राप्त करुन दिलं अन् थेट राज्याच्या राजकारणात पुणे शहराचं नाव महत्वाच्या शहरांमध्ये कोरलं.
पुणे जिल्हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गोष्टींनी महत्त्वाचा आहे. तसाच पुण्यातला (Pune Vidhan Sabha Election 2024) राजकीय वारसा देखील खूप मोठा आहे. पुण्यातील नेते हे खासदारांपासून ते केंद्रिय मंत्री पदापर्यंत आपल्याला दिसतात. अशाच या पुण्यात लोकसभेनंतर आता हळूहळू विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत.
पुण्यातील राजकीय वर्चस्वाबाबत बोलायचं झालं तर पुणे लोकसभा (Pune Vidhan Sabha Election 2024) मतदार संघात कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी हे विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात सहाही विधानसभा मतदार संघात भाजपची बऱ्यापैकी पकड आहे. जिल्ह्याबाबत बोलायचे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे (पक्षफुटीनंतर आता सर्व जागा अजित पवार गटाकडे गेल्या आहेत) 10 आमदार आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे 8 आहेत, तर काँग्रेसचे 3 आमदार आहेत.
पुण्यात (Pune Vidhan Sabha Election 2024) कोथरुड आणि कसबा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानता जातो. त्यात सहा विधानसभा मतदारसंघात पाहिलं कसबा सोडला तर बाकी पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. कसबा देखील भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा मात्र कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि रवींद्र धंगेकर यांनी इथून विजय खेचून आणला. त्यामुळे भाजपला बालेकिल्ला असला तरीही इथे धंगेकरांना मानणारा देखील मोठा वर्ग आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा येत्या विधानसभेमध्ये कसब्यातील मतदान गेम चेंजर ठरु शकतो.
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार?
जुन्नर विधानसभा - अतुल बेणके (राष्ट्रवादी - अजित पवार)
आंबेगाव विधानसभा - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार)
खेड आळंदी विधानसभा - दिलीप मोहिते (राष्ट्रवादी - अजित पवार)
शिरुर विधानसभा - अशोक पवार (राष्ट्रवादी - अजित पवार)
दौंड विधानसभा - राहुल कुल (भाजप)
इंदापूर विधानसभा - दत्ता भरणे (राष्ट्रवादी - अजित पवार)
बारामती विधानसभा - अजित पवार (राष्ट्रवादी)
पुरंदर विधानसभा - संजय जगताप (काँग्रेस)
भोर विधानसभा - संग्राम थोपटे (काँग्रेस)
मावळ विधानसभा - सचिन शेळके (राष्ट्रवादी - अजित पवार)
चिंचवड विधानसभा - अश्विनी जगताप (भाजप)
पिंपरी विधानसभा - अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी - अजित पवार)
भोसरी विधानसभा - महेश लांडगे (भाजप)
वडगावशेरी विधानसभा - सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी - अजित पवार)
शिवाजीनगर विधानसभा - सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
कोथरुड विधानसभा - चंद्रकांत पाटील (भाजप)
खडकवासला विधानसभा - भीमराव तपकीर (भाजप)
पर्वती विधानसभा - माधुरी मिसाळ (भाजप)
हडपसर विधानसभा - चेतन तुपे (राष्ट्रवादी - अजित पवार)
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा - सुनिल कांबळे (भाजप)
कसबा पेठ विधानसभा - रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
21 पैकी कोणाचे किती आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 10
भाजप - 8
काँग्रेस - 3
जुन्नर विधानसभा -
2019 मध्ये झालेल्या जुन्नर विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र, खरी लढत अतुल बेनके, विद्यमान आमदार, व आशा बुचके यांच्यामध्ये झाली.
आंबेगाव विधानसभा -
आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्याच फेरीत जोरदार मुसंडी घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात वळसे पाटील विजयाची परपंरा राखली.
खेड आळंदी विधानसभा -
खेड-आळंदी मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार दिलिप मोहिते यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्यावर 33 हजाराच्या मताधिक्याने विजय मिळविला आणि गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडे गेलेला हक्काचा गड राष्ट्रवादीने पुन्हा खेचून परत आणला. खेड आळंदी विधानसभेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपली कमांड कायम राखली.
शिरुर विधानसभा -
शिरूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे बाबूराव पाचर्णे व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अशोक पवार या आजी- माजी आमदारांतील आणि विधानसभेच्या गेल्या तीन निवडणुकांतील एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यातील सामना झाला. यामध्ये अशोक पवार यांचा विजय झाला.
दौंड विधानसभा -
दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार व विद्यमान आमदार राहुल कुल हे 673 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपचे राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत कुल यांनी बाजी मारली.
इंदापुर विधानसभा -
इंदापुर विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सुमारे 3 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. त्यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पुन्हा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे व भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत झाली होती.
बारामती विधानसभा -
विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार 1,65,265 मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवीत विजयी झाले होते. अजित पवार यांना 1,95,641; तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांना 30,376 मते मिळाली.
पुरंदर विधानसभा -
पुरंदर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे विजय शिवतारे आणि काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्यात लढत झाली होती. पुरंदर हवेली मतदार संघात संजय जगताप यांचा 31404 मतांनी विजय झाला.
भोर विधानसभा -
भोर विधानसभा मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीतील काॅंग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी विजयाची हॅटट्रीक केली होती. अतितटीच्या लढतीत संग्राम थोपटे हे 9 हजार 206 मतांनी विजयी झाले होते. संग्राम थोपटे यांना 1 लाख 8 हजार 925 मते मिळाली तर त्यांचे प्रमुख विरोधक महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांना 99 हजार 716 मते मिळाली होती.
मावळ विधानसभा -
राज्यातील चुरशीच्या लढतीत समावेश असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव केला. मावळ मतदारसंघात एकूण सात उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्यात आहे. 2009 आणि 2014 मध्ये भाजपमधून भेगडे आमदार झाले. त्यानंतर ते तिसऱ्यांदा रिंगणात उतरले. मात्र त्यांचा पराभव झाला आणि सुनील शेळके आमदार झाले.
चिंचवड विधानसभा -
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप विजयी झाले होते. त्याचे प्रतिस्पर्धी राहुल कलाटे पराभूत झाले होते. मात्र, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर या जागी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप विजयी झाल्या.
पोटनिवडणुक - चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला. त्यांना 1 लाख 35 हजार 494 मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांच्या राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 99 हजार 424 मते मिळाली. यात जगताप यांचा 36 हजार 70 मतांनी विजय झाला आहे. तिसऱ्या स्थानावरील अपक्ष राहुल कलाटे यांना 40 हजार 75 मते मिळालेली होती.
पिंपरी विधानसभा -
पिंपरी विधानसभा राखीव मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना पराभवाचा धक्का देत 19 हजार 618 मतांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. आजी-माजी आमदारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. या विजयाने बनसोडे यांनी मागील पराभवाची कसर भरून काढली.
भोसरी विधानसभा -
भोसरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून तिथे अपक्षांचा विजय झाला आहे. ही परंपरा 2019 मध्ये महेश लांडगे यांनी खंडित केली. भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवून त्यांनी मतदारसंघ स्वतःकडे राखला आहे. साधारणतः पाऊण लाखांच्या मताधिक्क्याने त्यांनी विजय प्राप्त केला आहे.
वडगाव शेरी विधानसभा -
वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्येच ' टफ फाइट' होणार झाली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे आणि भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांच्यात लढत झाली. सुनिल टिंगरे यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता.
शिवाजीनगर विधानसभा -
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीनंतर काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी बाजी मारुन विजय मिळविला. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरले होते. अखेरच्या फेरीत सिद्धार्थ शिरोळे यांनी ५१४९ मते मिळवून विजय खेचून आणला.
कोथरूड विधानसभा -
राज्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील 25 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात मनसेच्या किशोर शिंदेंनी लढत दिली होती. घासून झालेल्या लढतीत पाटलांचा विजय झाला. चंद्रकांत पाटील यांना 1 लाख 4 हजार मतं मिळाली, तर किशोर शिंदेंना 79 हजार मतं मिळाली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील शेवटच्या क्षणी कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सर्व प्रमुख विरोधी पक्षांनीही या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे, भाजपचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या या मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेलं होतं, मात्र चंद्रकांत पाटलांनी विजय मिळवला.
खडकवासला विधानसभा -
पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भिमराव तापकीर 2500 मतांनी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांचा त्यांनी पराभव केलाय. चुरशीच्या झालेल्या या लढतीत दोडकेंनी तापकीरांना टफ फाईट दिली. तापकीरांना 1,18,627 मतं, तर दोडकेंना 1,16,512 मतं मिळाली आहेत. भाजपचे आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नगरसेवक सचिन दोडके यांच्यात खडकवासला मतदारसंघात थेट लढत झाली.
मतदारसंघाच्या फेररचनेनंतर 2009 मध्ये निर्माण झालेल्या खडकवासला मतदारसंघातून मनसेचे रमेश वांजळे निवडून आले होते. त्यांचे निधन झाल्याने, पोटनिवडणुकीत तापकीर निवडून आले. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये तापकीर पुन्हा विजयी झाली. यावेळी त्यांची हॅट्रीक होणार का, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
पर्वती मतदारसंघ -
मागील 2 टर्म आमदार असलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यावेळीही आपला गड राखण्यात यशस्वी झाल्या. 36, 767 मतांनी त्यांनी राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना पराभूत केले. मिसाळ यांना 97, 012 मतं मिळाली, तर कदम यांना 60, 245 मतं मिळाली. भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कदम यांच्यात पर्वती मतदारसंघात मुख्य लढत झाली. मतदारसंघाच्या फेररचनेनंतर 2009 मध्ये पर्वती मतदारसंघ सर्व उमेदवारांसाठी खुला झाला. तेव्हापासून माधुरी मिसाळ या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
हडपसर विधानसभा -
हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेला धक्का देत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली. भाजप-शिवसेनेचे उमेदवार योगेश टिळेकर यांना मागे टाकत राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे सुमारे 3 हजार मतांनी विजयी झाले.
कँटोन्मेंट विधानसभा-
पुणे शहरात कमी मतदारसंख्या असलेल्या कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार व महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष सुनील कांबळे यांनी 2332 मते मिळवून बाजी मारली आहे. कांबळे यांनी 284 मतांनी बागवेंवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना 2048 मते, वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण आरडे यांना 1419 इतकी मते, तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनीषा सरोदे यांना 311 मते मिळाली आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात होत असलेली ही लढत अत्यंत चुरशीची ठरली.
कसबा पेठ विधानसभा -
कसब्यात तीन दशकांनंतर इतिहास घडला. पोटनिवडणुकीतच भाजपचा गडाला काँग्रेसने सुरूंग लावला. पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार मतांनी पराभव केला, आणि दणदणीत विजय मिळवला. पुण्यातील कसबा पेठेत काही ठिकाणी भाजपची चलती आहे, मात्र, काही ठिकाणी रविंंद्र धंगेकरांना मानणारा मोठा वर्ग आहे.
पुण्यातील राजकीय परिस्थिती
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात मोठा बदल दिसण्याची शक्यता आहे. राज्यात झालेल्या दोन पक्षांच्या फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत जागावाटप आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी भाकरी फिरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आमदारांच्या उमेदवारीला कात्री लागण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, जिल्ह्यात सर्वांत जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवारांनी दावा केल्यानंतर आणि पक्षात फुट पडल्यानंतर आता हे सर्व आमदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये या जागांवर महाविकास आघाडीतून शरद पवारांचा पक्ष जागा घेणार की, सर्व पक्षांना समान संधी मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
तर दुसरीकडे अजित पवाराकडे जिल्ह्यात सर्वाधिक जागा आहेत त्या या निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षाचे उमेदवार देणार की, त्यांना जागांमध्ये काही ठिकाणी वाटाघाटी करावी लागणार, त्याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जागावाटपानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. त्याचबरोबर या निवजृडणुकीमध्ये पक्षफुटीचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीवरून व्यक्त केली जात आहे.