Thane News : महापालिका आयुक्तांना निवडणूक आयोगाची नोटीस; अंतिम आराखड्यावर सही न केल्याने मागवला खुलासा
Thane News : निवडणूक विभागाच्या या पत्रामुळे पालिका अधिकाऱ्यांची देखील चांगलीच धावपळ सुरु असून अंतिम आराखड्यावर सही न करणे प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आल्याचे चित्र आहे
Thane News : ठाणे महापालिकेच्या अंतिम आरखड्यावर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सही न केल्याने अखेर यांची दखल निवडणूक विभागाने घेतली आहे. यासंदर्भात निवडणूक विभागाकडून नोटीस देण्यात आली असून यामध्ये सही न करण्यामागचा खुलासा मागवला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. निवडणूक विभागाच्या या पत्रामुळे पालिका अधिकाऱ्यांची देखील चांगलीच धावपळ सुरु असून अंतिम आराखड्यावर सही न करणे प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आल्याचे चित्र आहे, मात्र या संदर्भात कोणतेही अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. असे कोणते पत्रच आले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांची फिल्डिंग
आगामी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून 14 मे रोजी ही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध देखील करण्यात आली आहे. यापूर्वीच आपापल्या पक्षाला अनुकूल असे प्रभाग तयार करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी फिल्डिंग लावली होती. ज्यावेळी प्रारूप आराखडा तयार करण्यात आला त्यावेळी देखील या प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आले होते. हरकती सूचनांवर सुनावणी देऊन निवडणूक विभागाने अंतिम आराखडा पालिका प्रशासनाकडे पाठवला आहे. या आराखड्यावर मुख्य निवडणूक आयुक्त, पालिका उपायुक्त, नगर रचना सहाय्यक संचालक तसेच महापालिका आयुक्त यांची सही अनिवार्य आहे. मात्र पालिका आयुक्त सोडून या तिघांचीच केवळ अंतिम आराखड्यावर सही असल्याने आता याची दखल निवडणूक विभागाने घेतली आहे.
भाजप नेत्यांची सडकून टीका
पालिका आयुक्तांनी यासंदर्भातील खुलासा करावा अशी नोटीस त्यांना पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून यावर आता पालिका आयुक्त काय खुलासा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आयुक्तांच्या या वागण्यावर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली आहे. राजकीय दबावामुळे आयुक्त असे वागत नाहीत ना? असा सवाल भाजपने विचारलं आहे.
महत्वाच्या इतर बातम्या