पंढरपुरात विठ्ठल मंदिर उघडणार, पण अद्याप अधिकाऱ्याची खुर्ची रिकामी, नियोजनाचे तीनतेरा
Maharashtra Temple Reopen : पंढरपुरातील विठ्ठल मंदिर उघडणार असलं तरीसुद्धा मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्याची खुर्ची मात्र गेल्या 15 दिवसांपासून रिकामी आहे. त्यामुळे नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत.
पंढरपूर : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच, 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळांची दारं भक्तांसाठी उघडली जाणार आहेत. असं असलं तरीही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या (Vitthal Rukmini Temple, Pandharpur) कार्यकारी अधिकाऱ्याची खुर्ची बदलीमुळं गेल्या 15 दिवसांपासून रिकामी आहे. त्यामुळं मंदिरातील नियोजनाचे तिनतेरा वाजल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर हे विधी आणि न्याय विभागाकडं येत असल्यानं इथे उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रतिनियुक्ती दिली जाते. दरम्यान, ही खुर्ची गेल्या 15 दिवसांपासून रिकामी असल्यानं मंदिरातील नियोजनाअभावी अनेक समस्यांचा सामना मंदिर प्रशासनाला करावा लागत आहे.
पंढरपुरातील कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची बदली होऊन 15 दिवस होत आले. तरी अजून नवीन अधिकाऱ्याची नेमणूक झालेली नाही. अशातच 7 ऑक्टोबरपासून मंदिर भाविकांना खुलं होणार आहे. एकाबाजूला गेल्या सहा महिन्यांपासून भाविक विठु माऊलीच्या भेटीसाठी आतुर झाले आहेत. अशातच मंदिरं उघडण्यासाठी शासनाच्या नियमावलीचं पालन करणं, किती भाविकांना रोज दर्शनासाठी सोडावं, अशा अनेक गोष्टींबाबत 5 ऑक्टोबर रोजी मंदिर समितीची ऑनलाईन बैठक होणार आहे. या बैठकीलाही शासनाचा प्रतिनिधी म्हणून कार्यकारी अधिकाऱ्याची गरज असतानाही अजून ही खुर्ची मोकळी असल्यानं नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आहे.
दुसऱ्या बाजूला आता दर्शन व्यवस्था सुरु करताना ऑनलाईन दर्शन न देता थेट भाविकांना रांगेतून दर्शन देण्याची मागणी, राज्यभरातील भाविकांतून करण्यात येत आहे . विठुरायाचे अनेक भक्त हे गोरगरीब वर्गातून येत असल्यानं जो दर्शनाला पंढरपुरात येईल, त्याला नियम पळून रांगेतून दर्शनाला सोडावं, अशी मागणी भाविक करत आहेत. ऑनलाईन दर्शन व्यवस्थेमुळं ठराविक भाविकांनाच दर्शन घेता येतं. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही देवाच्या दर्शनाची वाट पाहत असून जे दर्शनाला येतील त्या सर्व भाविकांना थेट दर्शन रांगेतूनच दर्शन द्यावे, अशी मागणी भाविकांतून होत आहे.
7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळं सुरु होणार
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे, असं ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने करण्यात आलं आहे.